अध्यक्षपदासाठी नेत्यांची मुले रिंगणात : शेट्टी
By admin | Published: February 11, 2017 12:30 AM2017-02-11T00:30:13+5:302017-02-11T00:30:13+5:30
निवडणूक रणांगण : उदगाव येथे स्वाभिमानीचा प्रचार प्रारंभ
जयसिंगपूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या मुलांना उमेदवारी दिली आहे. तसेच अध्यक्षपद व लालदिव्याची हौस पूर्ण करण्यासाठी नेत्यांनी कस लावला आहे. मात्र, हे स्वप्न भंग होणार आहे. या निवडणुकीत स्वाभिमानीने अठरा पगड जातीच्या लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून उमेदवार जाहीर केले आहेत. या पाठबळावर ते निवडून येतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
उदगाव (ता. शिरोळ) येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार प्रारंभ येथील महादेवी मंदिरात करण्यात आला. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी उदगाव गावातूनच स्वाभिमानीचा उगम झाला. याच गावाच्या पाठबळावर चळवळ उभी राहिली आहे. त्यामुळे या चळवळीला बळ देण्यासाठी जिल्ह्यात २२ जिल्हा परिषद व ४४ पंचायत समितींसाठी स्वाभिमानीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आता मतदार व कार्यकर्त्यांच्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, मतदारसंघाचाच विचार न करता बांधकाम व आरोग्य सभापतीच्या कालावधीत शिरोळ तालुक्यात ७६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सध्या स्वाभिमानीतून बाहेर पडून अन्य पक्षात जाऊन अप्प्रचार करीत असलेल्या लोकांनी स्वाभिमानीच्या उमेदवारांवर केलेले आरोप खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी दिला.
तसेच उदगाव हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे तो अजिंक्य ठेवण्याचे काम कार्यकर्त्यांनीच केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश बंडगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मिलिंद साखरपे, विठ्ठल मोरे, आप्पासाहेब खर्डेकर, वसंत हजारे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मेघराज वरेकर यांनी संघटनेला दहा हजार रुपयांची देणगी दिली.
याप्रसंगी दीपाली ठोमके, मन्सुर मुल्लाणी, सरपंच स्वाती पाटील, गुंडा कोरे, प्रशांत हरणे, जालिंदर ठोमके, फरीद नदाफ, तात्यासो देसाई, आदिनाथ हेमगिरे, सागर चिपरगे, महेश ठोमके, शांताराम पाटील, श्रीराम चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीकांत चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
उदगाव (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानीचा प्रचार प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना खा. राजू शेट्टी. व्यासपीठावर सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, दीपाली ठोमके, सुनीता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.