नेते प्रचारात तर उत्पादक मात्र चाऱ्यासाठी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:45+5:302021-04-02T04:24:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इंगळी : ‘गोकुळ’च्या सत्ता केंद्रासाठी सर्व नेते राजकारणात व्यस्त आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे सत्ता केंद्र अव्याहतपणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इंगळी : ‘गोकुळ’च्या सत्ता केंद्रासाठी सर्व नेते राजकारणात व्यस्त आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे सत्ता केंद्र अव्याहतपणे सुरु आहे, ते सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी मात्र सध्या चारा टंचाईमुळे त्रस्त आहेत.
जिल्ह्यातील लाखो शेतकरी पशुपालनाच्या माध्यमातून दूध व्यवसायाशी जोडले गेले आहेत. ऊस शेतीमधून शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अधिक असले तरी दैनंदिन गरजांसाठी दूध व्यवसायावरच अवलंबून राहावे लागते. ग्रामीण भागातील अर्थकारण प्रामुख्याने दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. अलिकडील काळात पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याच्या प्रमाणात घट झाली असून, प्रामुख्याने चाऱ्यासाठी ऊस पिकावरच अवलंबून राहावे लागते.
जिल्ह्यातील बहुतांश भागात पशुधन वर्षातील नऊ ते दहा महिने ऊसापासून मिळणाऱ्या चाऱ्यावरच अवलंबून आहे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्याने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा चारा बंद झाला आहे. गवती कुरण क्षेत्रही घटल्याने चाऱ्याचे प्रमाणही घटले आहे व वळीव पाऊस झाल्याशिवाय आडसाली ऊस व खोडवा पिकामधून चारा काढता येत नाही. त्यामुळे सध्या चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्यासाठी मका व शाळू लागवडीचे प्रमाणही अत्यल्प असल्याने त्याच्या शोधासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे व चढ्या भावाने खरेदी करून पशुधनाचे संगोपन करावे लागत आहे. दरम्यान, टंचाईच्या या काळात पावसाळ्यासाठी साठवलेला सुका चारा आताच वापरला जात आहे. त्यामुळे पर्यायी दूध उत्पादनात घट होत आहे.
चौकट
उत्पादकामागील विघ्ने वेगळीच..
‘गोकुळ’च्या राजकारणात नेते वारसदारांचे बस्तान बसवण्यासाठी धडपडत आहेत, तर संस्था प्रतिनिधी ‘टोकण’च्या प्रतीक्षेत आहेत. गोकुळचे खरे शिलेदार मात्र या पूर्ण व्यवस्थेपासून दूरच आहेत. कोणत्याही परिस्थितीत इमानेइतबारे पशुधनाची सेवा करायची व संघाला दूध पुरवठा करायचा इथपर्यंतच त्यांची मर्यादा आहे.