‘गोकुळ’मध्ये नेत्यांच्या टँकरचा ‘थ्रो’ पास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:12+5:302021-05-23T04:23:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकूणच कामाला शिस्त लावण्यासाठी संचालकांनी कंबर कसली आहे. पूर्वीच्या नेत्यांचे दूध ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकूणच कामाला शिस्त लावण्यासाठी संचालकांनी कंबर कसली आहे. पूर्वीच्या नेत्यांचे दूध वाहतुकीच्या टँकरला ‘थ्रो’ पास होता. पहिल्या टप्प्यात एका नेत्याच्या पाच टँकरचा ‘थ्रो’ पास बंद केल्याने आता इतरांप्रमाणे नंबरातूनच त्यांना दूध भरावे व उतरावे लागणार आहे. त्याचबरोबर केवळ मुंबईचीच वाहतूक न देता लोकल दूध वाहतुकीची जबाबदारीही दिली आहे.
‘गोकुळ’मधील सत्तांतरानंतर संघातील चुकीच्या पायंड्यास ब्रेक लावण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू असून गेली अनेक वर्षे संघाच्या पूर्वीच्या नेत्यांचे वाहतूक संस्थेमार्फत ४० टँकर आहेत. संचालकांचेही त्यांच्या कुवतीप्रमाणे टँकर असले तरी नेत्यांच्या टँकरला ‘थ्रो’ पास होता. ‘गोकुळ’मध्ये टँकर आला की तो तात्काळ भरायचा आणि मुंबईतही तो विनानंबर उतरून घेतला जात होता. पुणे व स्थानिक चिलिंग सेंटरवरील वाहतुकीची बिले कमी निघत असल्याने नेत्यांचे सगळे टँकर मुंबई वाहतुकीसाठी होते. त्यातही थ्रो पास असल्याने टँकरचे चाक थांबतच नव्हते. हा मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला.
सत्तांतरानंतर एकूणच कामकाजाला शिस्त लावण्याचा सत्तारूढ गटाचा प्रयत्न आहे. एका नेत्याचे वाहतूक संस्थेच्या माध्यमातून २२ हजार लिटर क्षमतेचे पाच टँकर होते. पहिल्यांदा त्यांचा थ्रो पास बंद केला. आता त्यांना इतरांप्रमाणेच नंबरने दूध भरावे लागणार आहे.
संघाच्या माजी नेत्यांना नियम लावले आहेत. नेत्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने अधिकारी व कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.
अध्यक्ष निवडीनंतर दुसऱ्या दिवशी कार्यवाही
‘गोकुळ’ची अध्यक्ष निवड १४ मे रोजी झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ मे रोजी टँकर थ्रो पास बंद करण्यात आले.