सभापती निवडी लांबणीवर टाकण्याचा नेत्यांचा प्रयत्न
By admin | Published: September 23, 2014 11:08 PM2014-09-23T23:08:10+5:302014-09-23T23:54:19+5:30
कायदेशीर चाचपणी : ऐन निवडणुकीत डोकेदुखी
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडी लांबणीवर टाकण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कायदेशीर बाबींचा अभ्यास करून या निवडींना न्यायालयातूनच स्थगिती मिळविता येईल काय, याची चाचपणी कॉँॅग्रेसच्या पातळीवर सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांची निवड रविवारी (दि. २१) झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर २१ दिवसांत विषय समिती सभापतींच्या निवडी घ्याव्या लागतात. अडीच वर्षांपूर्वी ‘स्वाभिमानी’बरोबर आघाडी करीत त्यांना बांधकाम व आरोग्य सभापतिपद दिले. शिक्षण सभापतिपदी महेश नरसिंगराव पाटील, समाजकल्याण सभापतिपदी शशिकला रोटे, महिला व बालकल्याण सभापतिपदी भाग्यश्री गायकवाड यांना संधी देण्यात आली. आता अध्यक्षपदी पी. एन. पाटील यांच्या गटाच्या विमल पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाचे शशिकांत खोत यांची निवड झाली.
या दोन निवडी करताना या दोन नेत्यांसमोर अनेक अडचणी होत्या; पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट प्रदेश पातळीवरून तसे आदेश देण्यात आले. शुक्रवारी (दि. २६) विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार जोरात सुरू होणार आहे. मात्र, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर २१ दिवसांच्या आत म्हणजेच ११ आॅक्टोबरच्या आत निवडी कराव्या लागणार आहेत. १५ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. ऐन निवडणुकीत पुन्हा या निवडींसाठी घासाघीस करावी लागणार असल्याने रुसवा-फुगवा वाढणार आहे. यासाठी सभापती निवडीच विधानसभा निवडणुकीनंतर घेता येतात का? निवडीला स्थगिती देता येते का? या बाबींची कायदेशीर चाचपणी करण्यास नेत्यांनी सांगितले आहे.