नेत्यांनी सभ्य भाषा वापरावी

By admin | Published: June 23, 2015 12:37 AM2015-06-23T00:37:37+5:302015-06-23T00:37:37+5:30

उदय नारकर यांची टीका : मुश्रीफ-शेट्टी यांच्यातील वाद

Leaders use decent language | नेत्यांनी सभ्य भाषा वापरावी

नेत्यांनी सभ्य भाषा वापरावी

Next

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील सन्मान्य लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना सभ्य भाषा वापरावी, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव उदय नारकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
रविवारी शेट्टी यांनी मुश्रीफ यांना श्वान म्हटले, तर मुश्रीफ यांनी शेट्टी यांना कोल्हा म्हटले. त्या पार्श्वभूमीवर नारकर यांनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जनतेच्या प्रेमाच्या बळावर गेली अनेक वर्षे हे दोन्ही नेते राज्याच्या आणि देशाच्या प्रतिनिधीगृहांत प्रतिनिधित्व करत आहेत. जनतेला त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. या प्रतिनिधींनी जनतेच्या सभ्यतेचे प्रतिनिधित्व करावे, ही अपेक्षाही त्यात आहे; पण एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याच्या नादात या दोन्ही नेत्यांनी सभ्यतेचे सर्व संकेत पायदळी तुडवण्याचेच ठरवले आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे. या दोन नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेली शेरेबाजी हीनतेचे सवंग प्रदर्शन करणारी आहे. अशा प्रकारच्या शिवराळ भाषेमुळे क्षणिक मनोरंजन होईलही; पण त्यातून ‘लोकप्रतिनिधी’ या पदाचा अवमान होतो, हे या प्रतिनिधींनी लक्षात घ्यावे.
हे दोघेही संसदीय संकेतांचे जाणकार आहेत. लोकशाही कामकाजात असंसदीय शब्द वापरू नयेत, अशी प्रथा असते. संसदेने आपल्या वर्तनाने जनतेसमोर लोकशाही आदर्श प्रस्थापित करायचा असतो. त्यानुसार सार्वजनिक जीवनातून आणि विशेषत: राजकीय जीवनातून असंसदीय शब्द कटाक्षाने दूर ठेवले पाहिजेत. या सन्माननीय नेत्यांनी परस्परांना प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यात ठेवून वाकुल्या दाखवण्याचे काम थांबवावे. लोकशाहीत राजकारण ही वैयक्तिक बाब नसते. शाहू महाराजांचा वारसा सांगणाऱ्यांनी याचे भान ठेवावे. या दोघांपैकी एकाने तरी येथून पुढे राजकारणाचा स्तर खालावणार नाही, यासाठी पुढाकार घ्यावा. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी या आवाहनाला कोण प्रतिसाद देईल, हे पाहण्यासाठी जनताही उत्सुक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Leaders use decent language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.