टोल आंदोलनातून नेत्यांचा काढता पाय
By admin | Published: September 19, 2014 11:53 PM2014-09-19T23:53:52+5:302014-09-20T00:29:00+5:30
निवडणुकांचा परिणाम : आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय
कोल्हापूर : गेली तीन वर्षे टोलविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचे आदेश आम्ही जमिनीवर बसून मानले. आता निवडणुकीच्या तोंडावर या सर्वच खुर्चीवरील नेत्यांनी काढता पाय घेतला आहे. नेत्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली तरीही चार कार्यकर्त्यांसह का असेना, आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आज, शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला.
मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या या बैठकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिलीप देसाई, अशोक पोवार, बाबा इंदुलकर, प्रशांत जाधव, बाबा पार्टे, जयदीप शेळके, प्रशांत जाधव, अजित सासने, बजरंग शेलार, आदींसह ५०हून अधिक विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांपासून दूर काहीशा गुप्तपणे झालेल्या बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. कृती समिती राजकारणापासून लांब होती अन् राहील. कोणाला निवडून आणण्यासाठी किंवा गाडण्यासाठी कृती समिती स्थापन झालेली नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आंदोलनाची धग टोलप्रश्न मिटेपर्यंत तेवत ठेवण्याचे बैठकीत ठरले. उद्या, शनिवारी दुपारी चार वाजता कृती समितीचे कार्यकर्ते शाहू टोल नाक्यावरील ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांची वाढलेली मुजोरी व दादागिरीबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहेत. त्यानंतर पाच वाजता राजारामपुरीतील मारुती मंदिर चौकात जाहीर सभा होणार आहे.
निमंत्रक गैरहजर
कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे गेल्या साडेतीन वर्षांत प्रथमच आजच्या बैठकीला गैरहजर राहिले. निवास साळोखे यांनी दक्षिण मतदार संघातून भाजपकडून उमेदवारीची मागणी केली आहे. याबाबत ते म्हणाले, मला कोणत्याही पक्षाचे लेबल नव्हते, याचा अर्थ भविष्यात मी कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही, असे होत नाही. यापुढेही मी टोल आंदोलनात सक्रिय असेन.