सत्तेपर्यंत जायचे असल्याने ‘ताराराणी’शी आघाडी
By admin | Published: October 10, 2015 12:20 AM2015-10-10T00:20:53+5:302015-10-10T00:36:26+5:30
चंद्रकांतदादांचे स्पष्टीकरण : खालच्या पातळीवर जाऊन पत्रकबाजी केल्याने शिवसेनेशी फारकत
कोल्हापूर : नुसते व्हिजन असून उपयोग नसतो. ते सत्यात उतरण्यासाठी तुमच्याकडे सत्ता असावी लागते. आम्हाला काहीही करून सत्तेपर्यंत जायचे असल्याने ताराराणी आघाडीला आम्ही आमच्याबरोबर घेतले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. आघाडीचे नेतृत्व भाजपकडे आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभार ‘भाजप’च्या कल्चरनेच होईल. तिथे आम्ही काहीही गैर घडू देणार नाही, असाही विश्वास पालकमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जनतेला ‘लोकमत’च्या माध्यमातून दिला.पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘शिवसेनेशी युती न करण्याची महत्त्वाची दोन कारणे आहेत. मार्चमध्ये कोल्हापुरात भाजपचे अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून अनेक नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊनविखारी टीका केली. शिवसेनेवर आम्ही थेट कोणतीच टीका केली नसताना त्यांनी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन पत्रकबाजी करायला नको होती. आमदार जेव्हा टीका करत होते तेव्हा त्यांच्या नेतृत्वाने त्यांना लगाम घातला नाही. आणि नंतर मात्र ‘तुम्ही राज्यातील युतीचे समन्वयक आहात आणि कोल्हापुरातच युती कशी काय तोडता,’ असे विचारू लागले. आम्ही युती होणार नाही हे गृहीत धरून शांतपणे पर्याय शोधला. आम्ही ‘ताराराणी’शी आघाडी केल्यानंतर शिवसेनेच्या
नेतृत्वाकडून आमच्याकडे युतीबाबत विचारणा झाली; परंतु तोपर्यंत फारच उशीर झाला होता. दुसरे महत्त्वाचे की व्यावहारिक पातळीवर शिवसेनेशी युती करून सत्तेत येणे शक्य नाही, असा आमच्या पाहणीचा अहवाल होता. आम्हाला काहीही करून सत्तेपर्यंत जायचे आहे. ताराराणी आघाडीकडे सत्तेचा अनुभव आहे. भक्कम नेटवर्क आहे. ‘भाजप’ची बुद्धी व ‘ताराराणी’चे सामर्थ्य, अशा युतीचा पर्याय आम्ही निवडला.
ताराराणी आघाडीच्या नेतृत्वाकडे राजकीय निष्ठा, कोणतेच तत्त्वज्ञान नाही, अशा लोकांसोबत तुम्ही आघाडी केल्यामुळे भाजपवर टीका होत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता मंत्री पाटील म्हणाले, ‘महाभारतात श्रीकृष्णाने सत्याचा विजय व्हावा यासाठी अनेक तडजोडी केल्या. त्यास खोटे बोलावे लागले तरी तो बोलला. ‘ताराराणी’शी आघाडीही आम्ही कोल्हापूरच्या भल्यासाठी केली आहे. त्यामध्ये व्यक्तिगत काही स्वार्थ नाही आणि ताराराणी आघाडीचे म्हणाल तर वीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तिचे नेतृत्वही स्वरूप महाडिक यांच्यासारख्या चांगल्या तरुणांकडे आले आहे आणि सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे या आघाडीचे नेतृत्व भाजपकडे असेल. त्यामुळे लोकांना ताराराणी आघाडीचा जुना अनुभव आम्ही नक्की येऊ देणार नाही.’
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच आमचा प्रतिस्पर्धी असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘काँग्रेसकडे सतेज पाटील यांच्याशिवाय दुसरे कोणीच नाही. त्यांच्या डिजिटलवरही त्यांचा एकट्याचाच फोटो आहे. कारण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा फोटो लावण्यासारखा नाही. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे फोटो वापरल्यास मिळतील ती चार-दोन हजार मते कमी होतील. ‘राष्ट्रवादी’ने तगडे उमेदवार दिले आहेत. ते पैसा कुठून आणतात याचे कोडेच आहे.’
जागा वाटप
भाजप : ४१
ताराराणी आघाडी : ४०
भाजपच्या कोट्यातील ०३ जागा ‘स्वाभिमानी’ला.
ताराराणीच्या कोट्यातील ०२ जागा ‘रिपब्लिकन’ला.
आरोप झाल्यास राजीनामा घेणार
आम्ही भ्रष्टाचारी लोकांची अजिबात गय करणार नाही. एखाद्या नगरसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यास त्याने त्याचदिवशी संध्याकाळी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नक्कीच काही बंधने आणली जातील, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री प्रचाराला येणार
अर्ज भरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर भाजप प्रचाराची राळ उडवून देणार आहे. त्यासाठी ‘एक दिवस, एक मंत्री’ असे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या तोफा प्रचारात धडाडणार आहेत. पालकमंत्री स्वत: सगळे दौरे रद्द करून कोल्हापुरात तळ ठोकून बसले आहेत.
बामणे व कांदेकर यांच्याविषयी
भाजपने राजलक्ष्मीनगरातून शोभा बामणे व दुधाळी पॅव्हेलियनमधून हेमंत कांदेकर यांना उमेदवारी दिल्यावर आमच्यावर टीका करण्यात आली; परंतु ती गैर होती, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, ‘बामणे यांच्यावर गेल्या दहा वर्षांत एकही कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला नाही. कांदेकर यांच्यावरील गुन्हे हे पेठांतील वर्चस्वाच्या वादातून ज्या मारामाऱ्या होतात त्यातून दाखल केलेले गेलेले आहेत. कधी तरी गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना कायमचेच बाद ठरविणे योग्य नाही, अन्यथा त्यातून नवी अस्पृश्यता जन्माला येईल. त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. जरगनगर प्रभागातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नाना जरग यांनी ज्यांचे नाव सुचविले त्या उमेदवार आमच्या सर्व्हेमध्ये खाली होत्या. त्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही.
हद्दवाढीविषयी..
हद्दवाढ ही कोल्हापूर शहराची गरज आहे. त्यामुळे नगरसेवक,पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी जाऊन ग्रामीण भागातील जनतेला महापालिकेचा कारभार चांगला आहे, असे पटवून दिले पाहिजे तरच ग्रामीण भागातील जनता हद्दवाढीस सहमती देईल. त्यातही उद्योग क्षेत्र बाजूला ठेवूनच हद्दवाढ व्हावी, या मताचे आम्ही आहोत.
जिंकण्याचा अंदाज
भाजपने तीन सर्व्हे केले असून जास्तीत जास्त ५५ व काही झाले तरी ४६ जागा आघाडीच्या मिळतील, असा अंदाज आहे. त्यातही २६ भाजपच्या व २० ताराराणी आघाडीच्या असतील, असे सर्व्हेक्षणाचे अहवाल आहेत. चौथा सर्व्हे २० तारखेला समजेल. त्यावेळी खरे चित्र स्पष्ट होईल. कारण अर्ज कोण भरते, कुणाला जातीचा दाखला मिळत नाही यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
‘कोल्हापूर उत्तर’ जिंकणे हेच ‘टार्गेट’
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढविणार असल्यामुळेच महापालिका निवडणुकीवर जास्त लक्ष केंद्रित केले असल्याची चर्चा आहे, असे विचारले असता मंत्री पाटील हसून म्हणाले,‘कोल्हापूर उत्तर लढविणे हे माझे कधीच टार्गेट नाही; परंतु ‘उत्तर जिंकणे’ हे मात्र माझे नक्कीच टार्गेट आहे.’