‘सीपीआर’च्या जलवाहिनीला गळती; युध्दपातळीवर दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:24+5:302021-05-03T04:19:24+5:30
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयास पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनीला रविवारी पहाटे अचानक गळती लागल्यामुळे रुग्णालयाचा पाणी ...
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयास पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनीला रविवारी पहाटे अचानक गळती लागल्यामुळे रुग्णालयाचा पाणी पुरवठा काही तास बंद ठेवावा लागला. पर्यायी व्यवस्था म्हणून महानगरपालिकेमार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.
रविवारी पहाटेच्या दरम्यान रंकाळा बस स्थानकाजवळ जलवाहिनीला गळती लागली होती. ही बाब लक्षात येताच तातडीने सकाळी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. त्याचवेळी जलवाहिनीला लागलेली गळती काढण्याचे कामही हाती घेण्यात आले. दोन तासाच्या प्रयत्नानंतर युध्दपातळीवर जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली.
प्रमिलाराजे रुग्णालयास नियमित पाणी पुरवठा व्हावा, म्हणून महापालिका पाणी पुरवठा विभागाने रंकाळा रोडवरील नागोजीराव पाटणकर हायस्कूल येथून आठ इंची कनेक्शन दिले आहे. त्यामुळे रुग्णालयास पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होतो. या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा विस्कळित बनला. दुपारनंतर मात्र तो सुरळीत केला.