हसूर बुद्रुक नळपाणी योजनेस गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:57+5:302021-04-06T04:21:57+5:30
सेनापती कापशी : हसूर बुद्रुक (ता. कागल) या गावास हसूर खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा सुरू आहे. ...
सेनापती कापशी : हसूर बुद्रुक (ता. कागल) या गावास हसूर खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा सुरू आहे. या पाणीपुरवठा योजनेस मोठ्या प्रमाणात गळती आहे. परिणामी चार ते पाच दिवसांतून एकदा गावाला पाणी मिळत आहे. पिण्याच्या व खर्चाच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. चिकोत्रा नदीत पाणी असूनही ग्रामस्थांना पाणीटंचाई भासत आहे.
हसूर बुद्रुकची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. ग्रामपंचायत पातळीवर लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा गळती काढली. ग्रामपंचायत प्रशासनाला आर्थिक दृष्टीने हे शक्य नाही. गळती काढली तरीही सातत्याने मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. पाईपलाईन गळतीमुळे पिण्याच्या पाण्यासह खर्चाच्या पाण्यासाठीही वारंवार ग्रामस्थांना भटकावं लागत आहे.
सध्याची योजना ही २५ वर्षांपूर्वीची असून, पूर्ण खराब आणि जीर्ण झाली आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन नवीन योजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतुन जोर धरू लागली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन नवीन चार इंची पाईपलाईन योजना होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चौकट:- .
सध्याची नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण खराब झाली असून, पाईपलाईनला सातत्याने मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. ग्रामपंचायत देखील गळती काढून मेटाकुटीस आली आहे. परिणामी लोकप्रतिनिधींंना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नवीन पाणीपुरवठा योजना करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्काळ दखल घेऊन या योजनेस मंजुरी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुरुषोत्तम भीमराव साळोखे
उपसरपंच हसूर बुद्रुक
फोटो :- हसुर बुद्रुक, ता. कागल येथील पाणीपुरवठा योजनेस लागलेली गळती.