गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती, कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:28 PM2023-03-17T12:28:26+5:302023-03-17T12:28:46+5:30

शहरात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांचा ठणठणाट सुरु असतानाच लाखो लिटर पाणी जातंय वाया

Leakage of 40 lakh liters of pure water every day for the last three years, Kolhapur Municipal Corporation mismanagement | गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती, कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार 

गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती, कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार 

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील जलवाहिनींना गळती ही आता नवीन बाब राहिलेली नाही. निम्म्या ई वॉर्डाला पाणी पुरवठा करणाऱ्या कसबा बावडा येथील पंप हाऊसमधून गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उघड केला. या गळतीकडे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. 

कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ई वॉर्डाला पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातील पंप हाऊसमधून गेली तीन, चार वर्षे रोज चार एमएलडी म्हणजे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी उघडकीस आणला. चार वर्षांपासून असलेली गळती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काढलेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे लाखो रुपये वाया जात आहेत. कृती समितीचे ॲड. बाबा इंदूलकर, आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी जल अभियंत्यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर तांत्रिक विभागाचे सहायक अभियंता जयेश जाधव यांनी त्याठिकाणी भेट दिली. गेली दोन वर्षे पाणी वाहून जात असल्याचे जाधव यांनी मान्य केले.

पुईखडी, चंबुखडी आणि कसबा बावडा येथील शुद्धीकरण केंद्रातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदीमध्ये भरपूर पाणी आहे, पाण्याची उचलही दिवसाला १५० ते १६० एम.एल.डी. होते; पण गळतीमुळे उचललेल्या पाण्यापैकी ६० टक्के पाण्याचे बिलिंग होते. गळतीमुळे भरपूर पाणी असूनही नागरिकांना मात्र पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून लक्ष दिलेलं नाही, असा आरोप ॲड. बाबा इंदूलकर यांनी केला आहे.

गळती होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर

कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील संपाची बारा वर्षांपूर्वी दुरुस्तीची व गाळ काढण्याची कामे केली आहेत. तसेच या संपामध्ये येणाऱ्या रॉ वॉटर व जाणाऱ्या फिल्टर वॉटर पाइपचे काम चार वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले होते. त्यावेळी होणाऱ्या पाण्याची गळती थांबविण्यात आली होती. हा दगडी बांधकामाचा संप पूर्वीचा असल्याने या ठिकाणी अमृत १ योजनेमधून नवीन संप बांधण्याचे काम प्रस्तावित केले असून, काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर जुना संप वापरणे बंद केले जाणार आहे. या ठिकाणी संपाच्या तळातून व भिंतीतून पाण्याची गळती आहे. गळतीचे पाणी संपाच्या कोपऱ्यातून बाहेर एकत्रित करून पुन्हा पंपाने उचलून रिसायकल संपामध्ये टाकण्यात येते, असा खुलासा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

Web Title: Leakage of 40 lakh liters of pure water every day for the last three years, Kolhapur Municipal Corporation mismanagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.