गळतीच्या पाण्याची बचत

By Admin | Published: May 1, 2016 12:45 AM2016-05-01T00:45:49+5:302016-05-01T00:45:49+5:30

‘क्रॉस’चे आव्हान पेलले : नियोजनबद्ध काम; ५0 लाख लीटर वाचले

Leakage water saving | गळतीच्या पाण्याची बचत

गळतीच्या पाण्याची बचत

googlenewsNext

कोल्हापूर : शिंगणापूर पाणी योजनेच्या चार मोठ्या गळती, नवीन पाईपलाईनचे चार ठिकाणी एकाचवेळी जोडकाम असे आव्हानात्मक काम महापालिका पाणीपुरवठा विभागाने नियोजित वेळेपेक्षाही कमी वेळेत पूर्ण केले. दोन दिवसांत केलेल्या या कामांमुळे महापालिकेच्या गळतीमधून वाया जाणारे दर दिवसांचे सुमारे ५० लाख लिटर पाणी वाचले आहे.
सलग २० तास पाणी उपसा पंप बंद ठेवून अहोरात्र सुमारे १०० कर्मचारी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून एकाचवेळी काम सुरू करून तीन दिवसांचे काम अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करून ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर शहरात उद्भवणाऱ्या पाणीबाणीवर मात केली. विशेष म्हणजे, हे काम सुरू असताना जाहीर केल्याप्रमाणे निम्म्या शहरात पाणीटंचाईचे सावट असतानाही त्या भागात सुमारे २७ टँकरद्वारे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा केला. त्यामुळे नागरिकांची, नगरसेवकांची एकही तक्रार झाली नाही.
कोल्हापूर शहरात सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीची चार ठिकाणी असलेली गळती काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आल्याने शहराच्या निम्म्याहून अधिक भागांतील पाणीपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे शहरात पाण्याची अभूतपूर्व कृत्रिम टंचाई निर्माण झाली. गुरुवारी सकाळी सहा वाजता शिंगणापूरहून पुईखडीला नेण्यात येणाऱ्या चार पंपांद्वारे पाण्याचा उपसा बंद केला. त्यानंतर जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह रिकामे करणे, पाणी बाहेर काढणे, गळती काढणे, जुन्या पाईप तोडून नव्या पाईपला जोडणे, वेल्डिंग, आदी कामे अहोरात्र पूर्ण करून शुक्रवारी रात्री १२ वाजता शिंगणापूर योजनेचे चारही उपसा पंप एकापाठोपाठ सुरू करून जलवाहिनी सुरू केली. त्यानंतर शनिवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर योजनेवर आधारित असणाऱ्या बहुतांशी पाण्याच्या टाक्या काही प्रमाणात भरून त्याद्वारे सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागाने पेलले आहे.
प्रथमच एकावेळी चार क्रॉस बदलले
४दोन दिवस अहोरात्र जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. विशेष म्हणजे या कामात कोणताही अडथळा आला नाही. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई, त्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा अशा अवस्थेत हे काम करताना नागरिकांची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.
४त्यासाठी सुमारे १५ दिवस अगोदर गळतीच्या ठिकाणी खोदण्यात आले, तर नव्या जलवाहिनीला जोडण्यात येणाऱ्या ठिकाणीही यापूर्वीच खोदाई केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष गुरुवारी उपसा थांबविल्यानंतर कामाला सुरुवात केली, ते सुमारे वीस तासांनंतरच काम पूर्ण करूनच थांबविले.
४एकाचवेळी चार ठिकाणी जलवाहिनीवर क्रॉस टाकण्याचे धाडसाचे काम प्रथमच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पेलले.

आजपासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा
कोल्हापूर : जलवाहिनीला ‘क्रॉस’ व गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्यानंतर शनिवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरूझाला; पण कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने बहुतांश भागात टँकरनेच पाणीपुरवठा केला. दिवसभरात २७ टँकरद्वारे ११० फेऱ्यांद्वारे कृत्रिम पाणीटंचाईवर मात करता आली. सर्वच भागात आज, रविवारपासून नियोजनानुसार एक दिवसाआड पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले.
गुरुवारपासून फुलेवाडी जकात नाका, रिंगरोडवरील अयोध्या कॉलनी, नवीन वाशी नाका, ए-वन गॅरेज पुईखडी या चार ठिकाणची मोठी गळती काढण्याचे काम, तसेच जुन्या जलवाहिनीतील पाणीपुरवठा नव्या जलवाहिनीद्वारे करण्यासाठी ‘क्रॉस’ टाकण्याचे काम एकाच वेळी सुरु केल्यानंतर गुरुवारपासून शिंगणापूर येथून चारही पंपांद्वारे होणारा उपसा थांबविला होता. ही आव्हानात्मक कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शुक्रवारी मध्यरात्री शिंगणापूर पाणी योजनेचे चारही उपसा पंप कमी क्षमतेने सुरू करून चाचणी घेण्यात आली. पहाटेनंतर पाणी उपसा करून टाक्या भरल्या; पण कमी कालावधीमुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण न भरल्याने राजारामपुरी, साळोखेनगर, ए वॉर्ड, मंगळवार पेठ, आदी भागांत पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. शहरात आज, रविवारपासून एक दिवसाआड पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.
सणगर गल्लीत टँकर
दरम्यान, मंगळवार पेठेतील सणगर गल्लीत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. शनिवारी सकाळी या गल्लीत टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना महिलांत वादावादीचे प्रसंग निर्माण झाले; पण भागातील ज्येष्ठांनी हा वाद मिटविला.

Web Title: Leakage water saving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.