गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर

By admin | Published: April 28, 2016 11:21 PM2016-04-28T23:21:59+5:302016-04-29T00:54:11+5:30

पाणीपुरवठा बंदचा पहिला दिवस : शहरात २७ टँकरद्वारे दिवसभर ४५ फेऱ्या; काम संपण्यास उजाडणार शनिवारची पहाट

Leakage work | गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर

गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर

Next

कोल्हापूर : शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या गळती काढण्याचे काम गुरुवारी सकाळपासून युद्धपातळीवर सुरू झाले. तब्बल चार ठिकाणच्या मोठ्या स्वरूपाच्या गळती काढण्यात येत असल्याने हे काम पूर्ण होण्यास शनिवारची पहाट उजडणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिंगणापूर योजनेवर अवलंबून असलेल्या शहरातील निम्म्याहून अधिक भागास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून कोल्हापूर शहरात सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यातच शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीची चार ठिकाणी असलेली गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शहराच्या निम्म्याहून अधिक भागातील पाणीपुरवठा खंडित करावा लागला आहे. त्यामुळे शहरात पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. शहर पाणीपुरवठा विभागाने केलेल्या नियोजनानुसार गळती काढण्याचे काम सुरू झाले असून निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
सकाळी सहा वाजता शिंगणापूरहून पुईखडीला नेण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा बंद केला. जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह रिकामे करण्यात आले. त्यानंतर जलवाहिनीतील पाणी बाहेर काढण्यास पहिल्याच दिवशी थोडा विलंब झाला. ज्या ठिकाणी गळती आहे, तेथील जलवाहिनीतून अक्षरश: कारंजासारखे पाणी उडत होते. खुदाई करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले. खड्ड्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या मोटारी बसवून पाणी बाहेर काढावे लागले. जलवाहिनीतील तसेच खुदाई केलेल्या खड्ड्यातील पाणी बाहेर काढण्यात दुपारपर्यंतचा वेळ गेला. त्यानंतर काम सुरु झाले.
गळक्या जलवाहिनी काढण्यासाठी चिवा बाजार येथे एक किलोमीटरची तर अयोध्या पार्क येथील पाचशे मीटरची जलवहिनी आधीच टाकण्यात आलेली आहे. फक्त त्याला क्रॉस कनेक्शन जोडण्यात येणार आहे.
फुलेवाडी जकात नाका, अयोध्या पार्क, ए वन गॅरेज व चिवा बाजार अशा चार ठिकाणची ही गळती काढली जात आहे. चारही ठिकाणी जेसीबी, के्रन, पोकलॅँड, वेल्डिंग मशिन्स, गॅस कटर, जनरेटर सेट अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून एकूण साठ ते सत्तर कर्मचारी प्रत्यक्ष काम करत आहेत. हे काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे. त्यासाठी रात्रीच्या उजेडासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनपाचे जलअभियंता मनिष पवार, उपजलअभियंता प्रभाकर गायकवाड, शाखा अभियंता बी. एम. कुंभार आदी जातीने कामावर लक्ष ठेऊन आहेत.
सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी गटनेते सुनील पाटील यांच्यासह नगरसेविका वनिता देठे, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम, माजी नरगसेवक मधुकर रामाणे, दुर्वास कदम आदींनी गळती काढण्याची कामाची चारही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनिष पवार आदी उपस्थित होते.

टँकरने पाणीपुरवठा सुरू
जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला असल्याने पाणीपुरवठ्याची पर्यायी सोय म्हणून टँकरची सोय करण्यात आली आहे. शहरात भाड्याने घेतलेले १९ टँकर आणि महापालिकेचे आठ अशा एकूण २७ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात या टँकरनी ४५ फेऱ्या केल्या आहेत. गुरुवारी पाण्याची टंचाई जास्त जाणवली नाही, परंतु आज, शुक्रवारपासून तीव्रता जाणवणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेने गुरुवारपासून शहरातील चार महत्त्वाच्या ठीकाणी गळती काढण्याचे काम हाती घेतले. १) अयोध्या पार्क येथील गळती काढताना खड्ड्यात पाणी साठल्याने कामगारांना कसरत करावी लागली. २) फुलेवाडी जकात नाक्याजवळ गळती काढण्याचे सुरू असलेले काम ३) रिंगरोडवरील चिव्यांचा बाजार येथील गळती काढण्याचे काम सुरू असताना महापौर अश्विनी रामाणे, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, उपायुक्त विजय खोराटे, शारंगधर देशमुख, मनीष पवार, सुनील पाटील, आदींनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली.

Web Title: Leakage work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.