निसर्गाकडून शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:41 PM2019-04-07T23:41:50+5:302019-04-07T23:41:55+5:30

इंद्रजित देशमुख परवा एका व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी चाललो होतो. गाडीत ‘गदिमां’नी लिहिलेलं आणि सुधीर फडके बाबूजींनी गायिलेलं खूप छान जुनं ...

Learn from nature | निसर्गाकडून शिका

निसर्गाकडून शिका

googlenewsNext

इंद्रजित देशमुख
परवा एका व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी चाललो होतो. गाडीत ‘गदिमां’नी लिहिलेलं आणि सुधीर फडके बाबूजींनी गायिलेलं खूप छान जुनं गाणं लागलं होत. गाण्याचे बोल होते
संथ वाहते कृष्णामायी।
तिरावरल्या सुखदु:खाची जाणीव तिजला नाही।।
शब्दाने आणि स्वराने अतीव मधुर असणाऱ्या त्या गीताचे बोल ऐकून माझं मन एका वेगळ्याच चिंतनात गेलं. त्या गीतात रेखाटलेले नदीबद्दलचे शब्द निव्वळ नदी ही संकल्पना रेखाटत नाहीत, तर अखंड जीवनाचे स्थितप्रज्ञदर्शी लक्षण या गीतातून व्यक्त होत आहे असं वाटलं. साधकाला साधना मार्गात त्या सुविशेष बोधाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणारी ही भावसमृद्धी खूपच आवश्यक आहे, जी या
गीतात रेखाटली आहे. माउली ज्ञानोबारायांनी रेखाटलेली नदीबद्दलची
फेडीत पाप ताप।
पोखीत तीरींचे पादप।
समुद्रा जाय आप।
गंगेचे जैसे।।
या कल्पनेस अनुसरून स्थितप्रज्ञाच्या जीवनातील अविचल भाव नदीशी मिळताजुळता असतो. ती ज्या प्रदेशातून वाहत जाते, त्या प्रदेशातील दोन्ही काठांवर वास करणाऱ्यांना स्वच्छ करत दोन्ही काठांवरील उपयोगी आणि निरुपयोगी असणाºया सर्व वनस्पतींना जीवन देत ती आपला समुद्राला जाण्याचा म्हणजेच रूपाचा स्वरूपाच्या ठिकाणी विलयीत होण्याचा कार्यार्थही साधत असते. स्वत:च्या आत्मगतीने वाहताना ती कधीच लाभ-हानी, सुख-दु:ख, हर्ष, शोक अशा कोणत्याही स्थितीत स्वत:ला कंपायमान होऊ देत नाही. कुणी तिला मातृत्वाच्या आदराने पूजले किंवा कुणी धिक्कारले तरी ती सगळ्यांशी समत्वाच्या भूमिकेत राहत असते. कुणी तिला स्वीकारून आपलं जीवन सुजलाम्, सुफलाम् बनवते त्यांच्याबद्दल तिला लगाव नाही आणि कुणी तिच्या वाहत्या पाण्याचा अपव्यय केला तर त्याबद्दल तिला खेदही नाही. ती कुणाच्याच कोणत्याच स्वभावाला अथवा स्वाभाविक अभावाला दाद न देता आपल्या गतीमय कृतीत बदल न करता वाहत असते. ती आम्हाला आनंदच आनंद देत असते. भर उन्हात नदीकाठी डुंबणारी लहान मुलं हुंदडताना पहिली, त्यांचं ते पाण्यातलं मनसोक्त आनंद घेत खेळनं पाहिलं की पाहणारी व्यक्ती भौतिक जीवनात तनमनधनाने कितीही श्रीमंत असू दे, पण हे सुख कुणालाही हवंहवंसं वाटणारंच असतं. कारण या सुखाची निर्मिती अकृत्रिम अशा निसर्गस्नेहातून म्हणजेच नदीतून झालेली असते.
आमच्या साधकीय दशेचा विचार केला तर भवतालच्या निसर्गातील कितीतरी घटक आम्हाला खूप मोठ्या स्वरूपाचा साधकभाव जोपासण्या- बद्दलचा संदेश देत असतात. वास्तविक अवधूतांनी चोवीस गुरू केले होते असे आपण वाचतो. त्यातील बरीच गुरुस्थाने ही या निसर्गमालेतील होती. आपल्या अस्तित्वाने इतरांच्या अस्तित्वात भरच घालायची हे आम्हाला निसर्गच शिकवत असतो. आम्ही आमच्या अस्तित्वाने इतरांना सुखापेक्षा दु:खच जास्त देत असतो; पण निसर्गाकडून तुम्हाला आणि मला निव्वळ आणि निव्वळ सुखच देण्याचा प्रयत्न होत असतो. त्याचाच परिपाक म्हणून आपण आपल्या शेतात मूठभर पेरतो आणि पोत्याने पिकवतो. आपल्या डोळ्यांनी उघड उघड दिसणारा किती मोठा चमत्कार आहे हा. हा चमत्कार झाला नसता तर आमचं पोटच भरलं नसत. म्हणजेच जीवसृष्टीचं जीवन सुरक्षित राहिलंच नसतं. आम्ही त्याच्याशी कसंही वागू दे, तो मात्र हजारो हातांनी आमच्यावर सुखाचा वर्षाव करत असतो.
सकाळी सकाळी उगवत्या सूर्याकडे पाहून जीवनात हजार वेळा झालेला पराभव पचवण्याचं अंगात येणारं बळ, मावळत्याला पाहून आयुष्याची सर्वोच्च प्रगल्भता कशी असावी याची निर्माण होणारी चेतना, मिटलेल्या कळीकडे पाहून स्वत:मध्ये सामर्थ्य असूनदेखील किती मिटून राहावं हा अमणित्वाचा होणारा बोध, तर फुललेल्या फुलाकडे पाहून स्वत:चं व्यक्तिमत्त्व टवटवीत फुलवावे आणि जगाला सुगंध द्यावा, दृष्टीला आनंद द्यावा आणि स्पर्शातूनदेखील मृदुतेचा आल्हाद द्यावा हे मिळणारं जीवनोपयोगी तत्त्वज्ञान. पानगळीत ओसाड झालेल्या वनातून सर्वसंगाचा परित्याग काय असतो किंवा कसा असावा याचं होणारं दर्शन, तर त्याच वनातून वसंताच्या फुलण्यातून निर्माण झालेला सौंदर्याचा अजब सोहळा, पावसाळ्यातील सरीवर सरीचं नि:पक्षपाती बरसणं, हिवाळ्यातील स्वास्थ्य विकासासाठीचं गारठवणं आणि उन्हाळ्यात या सगळ्यातील सोशिकता वाढविण्यासाठी आम्हाला तापवणं हे आणि या प्रकारचे कितीतरी गुरुबोध आम्हाला या निसर्गातून मिळत असतात. आमच्या नजरेत निरीक्षण भाव असेल तर या सगळ्या बोधातून आमचा जीवन विकास नक्कीच साधेल. आमचं दृष्टीक्रमण त्या दिशेने व्हावं आणि एक संवेदना लाभलेला देह आम्हाला मिळाला म्हणून या सगळ्याच्या कृतज्ञतापूर्वक जोपासनेची आणि संवर्धनाची जाणीव आमच्या आत सतत तेवत राहावी एवढीच अपेक्षा.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)

Web Title: Learn from nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.