बायका शिकल्या; पण शहाण्या झाल्या का ?
By admin | Published: June 6, 2015 12:22 AM2015-06-06T00:22:28+5:302015-06-06T00:28:34+5:30
तारा भवाळकर : सावित्रीबाई फुले स्मृती विशेषांकाचे प्रकाशन
कोल्हापूर : सावित्रीबार्इंनी स्त्रीला व्यक्त होण्यासाठी लिहिण्या-वाचण्याचे माध्यम दिले; पण त्याआधीही आपण ज्यांना अडाणी म्हणतो, त्या बायका खूप शहाण्या होत्या. आपले बंड, समाजाची वास्तवता त्या जात्यावरील ओव्यांतून व्यक्त करायच्या. आज बायका शिकल्या आहेत; पण त्या ज्यांना अडाणी म्हणतात, त्या बायकांइतके शहाणपण त्यांच्याकडे आले आहे का? अशा शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी स्त्रीशिक्षणाचे वास्तव मांडले.
शाहू स्मारक भवनमध्ये शुक्रवारी आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्यावतीने ‘सावित्रीबार्इंची स्त्रीशिक्षणाची चळवळ : प्रगतिपथ आणि सद्य:स्थिती’ या विषयावर आधारित सावित्रीबाई फुले स्मृती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मेघा पानसरे होत्या.
भवाळकर म्हणाल्या, स्त्रीमुक्तीचे फॅड पाश्चात्त्यांकडून आल्याची ओरड होते; पण त्याही आधी परंपरेच्या जोखडात बांधलेल्या स्त्रीने ‘पुरुषाचा कावा, मला येडीला काय ठावा; अरं घरोटा घरोटा, तुझ्यातून पडं पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी’ अशा कितीतरी जात्यावरच्या ओव्यांतून वास्तव मांडले आहे; पण त्यांचे व्यक्त होणे जात्याच्या पलीकडे गेले नाही. ते मांडण्याचे काम सावित्रीबार्इंनी केले. फक्त लिहिता-वाचता येणे म्हणजे शिक्षण का? नावामागे डिग्ऱ्यांचे शेपूट घेऊन कधी शहाणे होता येत नाही. शिक्षण नाही म्हणून जात्यावर ओव्या गाणाऱ्या बायकांना तुम्ही अडाणी म्हणणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘धन्य धन्य सती सावित्री, स्त्रियांची धात्री, असू द्यावे खात्री’ या पोवाड्याने त्यांनी मनोगताची सांगता केली.
मेघा पानसरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. शिवाजी माळी याने प्रास्ताविक केले. सुशील लाड याने विशेषांकामागील भूमिका विशद केली. सुनेत्रा ढेरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)