तब्बल आठ महिन्यांनंतर मुरगुडात लर्निंग ट्रायल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:28+5:302020-12-07T04:18:28+5:30
नागरिकांतून जोरदार मागणी अनिल पाटील: मुरगूड : कोरोनाच्या जागतिक महामारी दरम्यान गेली आठ महिने बंद असलेल्या मुरगूड येथील वाहनचालक ...
नागरिकांतून जोरदार मागणी
अनिल पाटील:
मुरगूड : कोरोनाच्या जागतिक महामारी दरम्यान गेली आठ महिने बंद असलेल्या मुरगूड येथील वाहनचालक लर्निंग लायसन ट्रायलला सुरुवात झाली आहे. कोरोना काळात रखडलेली प्रलंबित वाहन चालक लायसन अपडेट डिसेंबरअखेर करायची असल्यामुळे पंधरावड्यातून एकदा होणारा येथील कॅम्प आठवड्यातून एकदा व्हावा, अशी मागणी वाहनचालक व मोटर ड्रायव्हर ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी केली आहे.
मुरगूडमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी वाहन चालविण्याची कच्ची व पक्की लायसन्स देण्यासाठी आरटीओ कार्यालयामार्फत कॅम्प घेतला जातो. कागल राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांतील शेकडो वाहनधारक या कॅम्पमध्ये सहभागी होतात. येथील सर पिराजीराव गूळ उत्पादक सोसायटीच्या प्रांगणात हा कॅम्प भरतो. सभागृहांमध्ये कागदपत्रांची पूर्तता व तपासणी आणि मैदानावर दुचाकी व चारचाकी वाहनांची प्रत्यक्ष वाहन चालकांकडून ट्रायल घेतली जाते. ऑनलाइन नाव नोंदविल्यानंतर प्रत्येक कॅम्पच्या वेळी १२० जणांना अपॉइंटमेंट दिली जाते. दिलेल्या अपॉइंटमेंटधारकांनी आरटीओ कार्यालयाने दिलेल्या वेळी ट्रायल द्यावी लागते. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक ऑनलाईन नोंदणीधारकाला कच्चे अथवा पक्के लायसन्स व ट्रायल द्यावी लागते.
ऑक्टोबर महिन्यापासून कॅम्प सुरू झाला. पण, ट्रायल घेतली जात नव्हती. गेल्या बुधवारपासून येथे वाहनचालकांची ट्रायलही घेतली जात आहे. मार्च महिन्यापासून कोरानाच्या पार्श्वभूमीवर कॅम्प पूर्णपणे बंद होता. या काळात घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखा रखडल्या आहेत. शिवाय गेले सात-आठ महिने कॅम्प बंद असल्यामुळे अनेक वाहन चालकांची लायसन्सविना कुचंबणा होत आहे. प्रत्येक कॅम्पला १२० हा कोटा असल्यामुळे सध्या प्रलंबित लायसन्स मागणी करणाऱ्यांची संख्या प्रचंड झाली आहे. काहीजणांची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. आलेला लोड कमी करण्याच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयाने मुरगुडात किमान तात्पुरत्या स्वरूपात येत्या एक-दोन महिन्यांसाठी दर आठवड्याला लायसन्ससाठीचा कॅम्प सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
फोटो ओळ :-
मुरगूड (ता. कागल) येथे आरटीओ कॅम्पमध्ये लर्निंग ट्रायलसाठी आलेली वाहने व वाहन चालक यांची गर्दी.
.