महिन्यात घर सोड, नाही तर मुडदा पाडीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:29 AM2021-09-05T04:29:11+5:302021-09-05T04:29:11+5:30
कोल्हापूर : अपार्टमेंटमधील एकत्रित खर्चाच्या खोट्या हिशेबाच्या माध्यमातून ५८ हजार ८०० रुपयांच्या फसवणुकीसह मारहाण केली, तसेच महिन्यात घर सोड ...
कोल्हापूर : अपार्टमेंटमधील एकत्रित खर्चाच्या खोट्या हिशेबाच्या माध्यमातून ५८ हजार ८०० रुपयांच्या फसवणुकीसह मारहाण केली, तसेच महिन्यात घर सोड नाही तर तुझा मुडदा पाडीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी नितीन लोंढे (रा. सम्राटनगर), त्यांचा मेहुणा व इतर अनोळखी दोघे अशा चौघांवर राजारामपुरी पोलीस गुन्हा दाखल झाला. ही घटना येथील सम्राटनगरातील एका अपार्टमेंटमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उत्कर्ष प्रभाकर फडणीस (वय ५७ रा. सम्राटनगर) तसेच संशयित आरोपी नितीन रंगराव लोंढे हे दोघे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. लोंढे यांनी वहीत फडणीस यांच्या नावापुढे वीज, पाणी बिलाचा खोटा हिशेब करून २०१२ ते २०१८ या कालावधीतील प्रतिमहा ७०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ५८ हजार ८०० रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच जून २०१९ मध्ये लोंढे यांनी मेहुना व अनोळखी दोन व्यक्तींच्या सहकार्याने टेरीसवरून फडणीस यांच्या फ्लॅटमध्ये जाणारा पाण्याचा पाईप कापून नुकसान केले. त्यावेळी धक्काबुक्की व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपार्टमेंटमधील फ्लॅट सोड, नाही तर टेरीसवरून खाली टाकीन, आमच्याविरोधात साक्ष द्यायलाही कोणी येणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर महिन्यात घर सोड, नाही तर मुडदा पाडीन, अशीही धमकी देत त्यांच्या अंगावरील शर्ट फाडून पोटात गुच्च्या घालून मारहाण केल्याची तक्रार उत्कर्ष फडणीस यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.