महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:34+5:302020-12-17T04:49:34+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता येत्या सोमवारी (दि. २१) केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी ११ वाजल्यापासून लॉटरी पद्धतीने ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता येत्या सोमवारी (दि. २१) केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी ११ वाजल्यापासून लॉटरी पद्धतीने ८१ प्रभागांवरील आरक्षण निश्चित केले जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सभागृहात जास्त गर्दी करू नये म्हणून सोडतीचे समाजमाध्यमे तसेच स्थानिक केबल वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालीही आता वेग घेणार असून, लोकांना निवडणूक नक्की कधी होणार याबद्दल उत्सुकता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दुपारी परिपत्रक पाठवून निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनास केली. त्यानुसार दुपारी चार वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक होऊन त्यामध्ये सोमवारच्या प्रभाग आरक्षण सोडतीचे नियोजन व जबाबदाऱ्यांचे वाटप संबंधित सर्व अधिकाऱ्यांना करण्यात आले. निवडणूक केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी आरक्षण सोडत हा निवडणुकीच्या प्रक्रियेचाच एक भाग मानला जातो.
राजकीय पक्षांची आज बैठक
प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पालिका प्रशासन गतिमान झाले असून, या पार्श्वभूमीवर उद्या, शुक्रवारी शहरातील सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना माहिती दिली जाणार आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस सोडत कशी काढली जाईल, याची प्रत्यक्ष उजळणी व प्रात्यक्षिक होणार आहे.
कोविडचे सावट अन् सभागृहातील उपस्थिती
कोविडच्या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृहाचा ५० टक्के क्षमतेने वापर करायचा आहे. त्यामुळे लोकांनी सभागृह तसेच परिसरात गर्दी करू नये म्हणून यू ट्यूब, फेसबुक यांद्वारे तसेच स्थानिक केबल टी.व्ही.मार्फत घरबसल्या सोडतीचा कार्यक्रम पाहता यावा, अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केले.
निवडणूक आयोगाचा कार्यक्रम -
१. सोडत काढण्याकरिता जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे - १७ डिसेंबर
२. प्रभाग आरक्षणाकरिता सोडत काढणे - २१ डिसेंबर
३. प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे - २३ डिसेंबर
४. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती-सूचना मागविणे - दि. २३ डिसेंबर ते दि. ४ जानेवारी
५. प्राप्त हरकती-सूचनांचे विवरणपत्र आयोगास सादर करणे - दि. ६ जानेवारी
(भारत चव्हाण)