महापालिका सोडतेय ‘पंचगंगे’त विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:41 AM2018-10-03T00:41:08+5:302018-10-03T00:41:15+5:30
भारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आवश्यक मशिनरी म्हणाल, तर जागेवर आहे. मनुष्यबळ म्हणाल, तर आवश्यकतेएवढे आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला, तर जनरेटरचीदेखील सोय आहे. फक्त जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कष्टाळू अधिकाºयांची वानवा आणि जबाबदार वरिष्ठ अधिकाºयांचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष या कारणांनी जयंती नाल्यातील सांडपाणी नव्हे विष थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही कितीही पंचनामे करा, कारणे दाखवा नोटीस द्या, वीज कनेक्शन तोडा, आम्ही आमच्या पद्धतीनेच काम करणार या अधिकाºयांच्या मानसिकतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, ही बाब अतिशय गंभीर आहे.
जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे रोजचंच दुखणं झाल्यामुळे अधिकाºयांच्या संवेदनाही बोथट झाल्या आहेत; पण याच बोथट संवेदना नदीच्या खालच्या बाजूकडील नागरिकांच्या जिवावर उठायला लागल्या आहेत, तरीही त्याचे काहीच वाटत नाही, हे मात्र भयंकर आहे. गेल्या सात- आठ वर्षांत असंख्यवेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्या, आयुक्त व महापौरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश झाले, वीज कनेक्शन तोडले, न्यायालयाने फटकारले, राष्ट्रीय हरित लवादाने फैलावर घेत प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करण्याचे बंधन घातले, अधिकाºयांना दंड करण्यात आला. तरीही महानगरपालिकेचा कारभार सुधारत नाही म्हटल्यावर आता काय करायला पाहिजे हाच प्रश्न आहे.
जरा पाऊस पडला, वीज पुरवठा बंद झाला, की जयंती नाल्याचे सांडपाणी वाहू लागते. रोजचेच दुखणं असल्याने अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी अशा सांडपाण्यात लक्ष घालत नाहीत; त्यामुळे जयंती नाला वाहतच आहे.
शहरातील जवळपास ६० एम. एल. डी. सांडपाणी उपसा करण्याची क्षमता असलेले ४५० एच. पी. क्षमतेचे पाच उपसा पंप बसविले आहेत. जनरेटर बसविला आहे; पण या यंत्रांचा पुरेपूर वापर करण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत.
एकाही अधिकाºयाने यात लक्ष घालून हा प्रश्न कसा सोडविला पाहिजे, याचा अभ्यास केलेला नाही. हा केवळ निष्काळजीपणाच म्हणायला पाहिजे.
दोन दिवस नाला थेट नदीत
जयंती नाला गेले दोन दिवस थेट नदीत मिसळत आहे. मंगळवारी दुपारी अचानक केबल शॉर्टसर्किटमुळे जळाली. ती बदलण्यासाठी दोन तासांहून अधिककाळ उपसा यंत्रणा बंद ठेवावी लागली. बुधवारी सकाळीदेखील हा नाला नदीत वाहत होता. ड्यूटीवरील कर्मचाºयांनी ब्लीचिंगचा डोस वाढवला;
पण हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हे.
अधिकाºयांचा हलगर्जीपणा नडतोय
शहरातील सांडपाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टीने जीवनमरणाचा प्रश्न आहे. ड्रेनेज विभागाचा कारभार एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाकडे सोपविण्यात आलेला असून, त्याची जबाबदारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली आहे. कुलकर्णी यांच्यावर पाणी पुरवठ्याची मुख्य जबाबदारी आहे; त्यामुळे ते पूर्णवेळ सांडपाणी प्रक्रियांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. ‘आग लागली की बंब जसे धावतात’ तसे हे कुलकर्णी काही प्रश्न निर्माण झाला की जयंती नाल्यावर धावतात, अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. जनरेटर खरेदी केला असला, तरी त्याला अद्याप कनेक्शन दिले गेले नाही, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे.
आता काय करायला पाहिजे ?
जयंती नाला बंधारा येथून सांडपाणी प्रक्रि या केंद्राकडे सांडपाणी वाहून नेण्याकरिता १००० एम. एम. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. जलवाहिनी टाकली त्यावेळचे सांडपाणी आणि आताचे सांडपाणी याचे प्रमाण वाढलेले आहे. महापालिकेकडे पाच उपसा पंप आहेत, त्यातील दोन २४ तास सुरू असतात. तीन स्टॅँडबाय म्हणून राखीव ठेवले जातात. जेव्हा पहाटे ५ ते दुपारी २ पर्यंत सांडपाण्याचा प्रवाह वाढतो, तेव्हा स्टॅँडबायपैकी आणखी एक - दोन पंप सुरू करावे म्हटले, तर जलवाहिनीची तितकी क्षमता नाही; त्यामुळे स्टॅँडबाय सुरू करता येत नाहीत. ही अडचण आणि पुढील काही वर्षांचा विचार करता आणखी एक जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे.
जयंती नाल्यावर जो बंधारा बांधण्यात आला आहे, त्याची उंची खूपच कमी आहे. त्यामध्ये पाणी अडविण्याची क्षमता कमी झाली आहे. बंधाºयाची उंची आणखी काही मीटरनी वाढवून सांडपाणी अडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. याशिवाय बंधाºयालगत जयंती नाल्याच्या पात्रातील साचलेला गाळ काढला गेला पाहिजे. तसेच नाल्याच्या पात्राची खोली वाढविली पाहिजे, ज्यामुळे सांडपाणी नदीत वाहण्याचे थांबेल.
जितका स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याचा विषय महत्त्वाचा आहे, तितकाच सांडपाणी निर्गतीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे; त्यामुळे या कामावर एक जबाबदार अधिकाºयाची नेमणूक तातडीने केली पाहिजे. त्यांच्याकडे अन्य कोणताही अतिरिक्त कार्यभार देता कामा नये.