एलईडी, ‘अमृत’च्या कामांवरून भडका, महापालिका सभेत नगरसेवक संतप्त : पूर्ततेकडे लक्ष द्या - महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:49 AM2019-12-21T11:49:43+5:302019-12-21T11:52:15+5:30
कोल्हापूर शहरात एलईडी बल्ब बसविण्यासह अमृत योजनेतील रखडलेल्या जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामांवरून शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत भडका उडाला. संतप्त नगरसेवकांनी सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अक्षरश: फैलावर घेतले.
कोल्हापूर : शहरात एलईडी बल्ब बसविण्यासह अमृत योजनेतील रखडलेल्या जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामांवरून शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत भडका उडाला. संतप्त नगरसेवकांनी सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अक्षरश: फैलावर घेतले.
दोन्ही विषयांवर माहिती देण्याकरिता नवीन रुजू झालेले तसेच कसलीच माहिती नसलेले अधिकारी व ठेकेदाराचे प्रतिनिधी सभेत उभे करण्यात आल्यामुळे तर नगरसेवकांनी सभागृह डोक्यावर घेतले. ‘तुम्ही ठेकेदाराचे लाड का करता?’ अशा संतप्त सवालापासून ‘तुम्हाला कोल्हापूर सोडून जावे लागेल,’ अशा इशाऱ्यांपर्यंत अधिकाऱ्यांना दम देण्यात आला.
स्थायी समितीच्या सदस्यांनी दिलेल्या पत्रानुसार महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी शहरात राबविण्यात येत असलेल्या अमृत योजना व एलईडी बल्ब बसविण्याच्या प्रकल्पावर चर्चा करण्याकरिता शुक्रवारी विशेष सभा आयोजित केली होती. सभेला संबंधित कामे घेतलेल्या ठेकेदाराचे जबाबदार प्रतिनिधी हजर ठेवावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या होत्या. तरीही त्याची फारशी गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे सभेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू झाला.
अमृत योजनेच्या ठेकेदाराचा एक प्रतिनिधी सभेत उभा करण्यात आला. त्याला कसलीच माहिती नव्हती. काम कधी पूर्ण करणार हेही त्याला सांगता आले नाही. त्यामुळे भडकलेल्या नगरसेवकांकडून त्याला सभागृहातून बाहेर काढण्यात आले. योजनेचे सल्लागार म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आधीच्या कार्यकारी अभियंत्यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नुकताच डी. के. महाजन यांनी कार्यभार घेतला आहे. त्यांच्याकडूनही समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे नगरसेवकांत भडका उडाला.
चर्चेदरम्यान जलअभियंता सुरेश कुलकर्णी सभागृहाच्या रोषाला बळी ठरले. संपूर्ण सभागृहाने त्यांना जबाबदार धरत ठेकेदाराला पाठीशी घातल्याबद्दल त्यांच्यावर हल्लाबोल चढविला. राहुल चव्हाण, नियाज खान, अजित राऊत, शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, माधुरी लाड, दिलीप पोवार, अभिजित चव्हाण यांनी कुलकर्णी यांना धुऊन काढले. संबंधित अधिकाऱ्यांना सभेत हजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या अधिकाऱ्यांना समोर आणा, अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी केली.
परंतु तेथे कोणीच उपस्थित नव्हते. रूपाराणी निकम यांनी हा सभागृहाचा, महापौरांचा अपमान आहे, असे सांगून तीव्र भावना व्यक्त केल्या. अजित राऊत यांनीही कुलकर्णी यांना सुनावले. चर्चा सुरू असतानाच ठेकेदाराचा प्रतिनिधी सभागृहात आला. त्यांच्यावर नगरसेवकांनी प्रश्नांचा भडिमार केला.
त्यामुळे गोंधळलेल्या त्या प्रतिनिधीने ‘मी नवीनच आलोय, ‘अमृत’ची कामे लवकरात लवकर करून घेतो,’ असे सांगताच नगरसेवकांनी कपाळावर हात मारून घेतले. त्याचवेळी जल अभियंता कुलकर्णी हसत होते. ते पाहून तर सभेत संतापाचा भडकाच उडला. शारंगधर देशमुख, विलास वास्कर भडकले. ‘आमची चेष्टा करायची ठरविलीय का? हसताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही?’ अशा शब्दांत देशमुख यांनी कुलकर्णींना फैलावर घेतले. सभागृहात याचे संतप्त पडसाद उमटले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे या योजनेचे सल्लागार आहेत. त्यांचेही एक उपअभियंता सभागृहात आले; परंतु त्यांना कारवाईचे अधिकार नसल्यामुळे पुन्हा आगीत तेल ओतल्यासारखे झाले. पाठोपाठ प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन सभागृहात पोहोचले. त्यांनीही ‘मी नुकताच रुजू झालो असल्याने मला संधी द्या,’ अशी विनंती केली. ठेकेदार का आला नाही याचे कारण त्यांनी सांगितले. तसेच यापुढील काळात मी स्वत: ठेकेदाराशी चर्चा करून कामाचा बार चार्ट ठरवितो.
त्याने ठरविलेल्या बार चार्टप्रमाणे काम केले नाही तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करतो. उर्वरित मुदतीत जास्तीत जास्त काम करवून घेण्याची जबाबदारी आपली राहील, असे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे सभागृहात उडालेला भडका शमला. यावेळी झालेल्या चर्चेत विजय सूर्यवंशी, रत्नेश शिरोळकर, उमा बनछोडे, उमा इंगळे यांनी भाग घेतला.
नगरसेवक म्हणजे वरातीत नाचणारी घोडी
अजित राऊत यांनी सभागृहाची चेष्टा सुरू असल्याबद्दल प्रशासनावर आगपाखड केली. जो प्रश्न आम्ही विचारतो त्याची सोडवणूकच होत नाही. पुन:पुन्हा त्यावर नुसती चर्चाच होते. आयुक्तांनी शहर स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतला आहे, तो आता या अधिकाऱ्यांवर उगारावा. नगरसेवक म्हणजे वरातीत नाचणारी घोडीच झाली आहेत. आम्ही नाचल्याशिवाय, ओरडल्याशिवाय काम पुढे जात नाही. मग अधिकारी करतात तरी काय? ठेकेदारांना झाकून ठेवण्याऐवजी या अधिकाऱ्यांनाच वळण लावण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
दोन दिवसांत एलईडीची कामे पूर्ण करा - महापौर
एलईडी बल्ब बसविण्याच्या कामावर किरण नकाते, अभिजित चव्हाण, शारंगधर देशमुख, अजित ठाणेकर, भूपाल शेटे, शोभा कवाळे, प्रवीण केसरकर, स्वाती यवलुजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याची दखल घेत महापौर लाटकर यांनी दोन दिवसांत सर्व तक्रारी दूर होतील, या दृष्टीने प्रशासनाने पाहावे, अशा सूचना दिल्या. जर ठेकेदार काम करणार नसेल तर कारवाई करा, असेही त्यांनी बजावले.