यंत्रमाग वीज, व्याज दर सवलत प्रस्ताव टप्प्यात
By admin | Published: September 28, 2016 12:42 AM2016-09-28T00:42:46+5:302016-09-28T00:43:08+5:30
वस्त्रोद्योग महासंघाच्या बैठकीत निर्णय : सूतगिरण्यांना बिनव्याजी अर्थसाहाय्य; १५७ कोटींची तरतूद
राजाराम पाटील==इचलकरंजी -राज्यातील यंत्रमागांसाठी प्रतियुनिट एक रुपये सवलतीकरिता २१३ कोटी रुपयांची तरतूद आणि यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जासाठी पाच टक्के व्याज दराची सवलत, तसेच सूतगिरण्यांना प्रती चाते (स्पिंडल) तीन हजार रुपये बिनाव्याज अर्थसाहाय्य देण्यासाठी १५७ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव शासन तयार करीत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या व्यापक बैठकीत वस्त्रोद्योग उपसचिव बी. बी. चव्हाण यांनी दिली.
राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या मुंबई येथील सभागृहात राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचे पदाधिकारी व कार्यकारी संचालकांची बैठक महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहकारी क्षेत्रातील सूतगिरण्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यावरील व्याज शासन भरणार असून, या मुदलाच्या रकमेची परतफेड गिरण्यांनी करावयाची आहे. तसेच सूतगिरण्यांना किफायतशीर भावात कापसाचा पुरवठा करण्यासाठी कापूस महासंघाने सहा लाख कापूस गाठी खरेदी करावा. यासाठी ४१९ कोटी रुपयांची तरतूद करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष स्वामी यांनी या प्रतिनिधीला दिली.
देशातील यंत्रमागांपैकी निम्म्याहून अधिक १३ लाख यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. सध्या असलेल्या अभूतपूर्व मंदीमुळे सहकारी सूतगिरण्या व यंत्रमाग उद्योग नुकसानीत आहे. नुकसान कमी करण्यासाठी दोन्ही उद्योगांना उत्पादनात घट करावी लागत आहे. दोन-तीन महिन्यांत राज्यातील एक कोटी जनतेला रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगामध्ये तो कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग केंद्रांमधील विधानसभा सदस्यांनी मुख्यमंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांची भेट घेऊन वस्त्रोद्योग वाचविण्याचे साकडे घातले. तसा आवश्यक प्रस्ताव आमदार हाळवणकर यांनी सादर केला आहे. दोन-तीन आठवड्यांत या पॅकेजची घोषणा होण्याची अपेक्षा आहे, असेही स्वामी यांनी स्पष्ट केले. या बैठकीस माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार विश्वनाथ चकोते, दीपकभाई पाटील, अनिल कवाळे, राहुल आवाडे, प्रा. किसनराव कुऱ्हाडे, विश्वनाथ मेटे, चंद्रकांत देशमुख, आदी प्रमुख उपस्थित होते.
मंत्री सकारात्मक : माहिती संकलन पूर्ण
इचलकरंजीमध्ये २७ आॅगस्टला झालेल्या वस्त्रोद्योग परिषदेमध्ये वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी, यंत्रमाग उद्योगाला विजेसाठी एक रुपया आणखीन अनुदान व कर्जावर पाच टक्के व्याज दराची सवलत देण्याची घोषणा केली होती. मंत्रीच सकारात्मक असल्यामुळे त्याप्रमाणे राज्यात असलेल्या वस्त्रोद्योगाच्या मुंबई, सोलापूर, औरंगाबाद व नागपूर येथील प्रादेशिक उपसंचालक कार्यालयांकडून वस्त्रोद्योगातील घटक उद्योगामध्ये सध्याच्या मंदीच्या झालेल्या परिणामांची आणि कर्जांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर झाले आहे.