जिल्ह्यात होणार डाव्या विचारसरणीची ‘वज्रमूठ’
By admin | Published: November 5, 2014 12:34 AM2014-11-05T00:34:41+5:302014-11-05T00:49:53+5:30
२९ नोव्हेंबरला परिषद : सामाजिक प्रश्नावर एकत्र येणार
दत्तात्रय पाटील -म्हाकवे -समाजातील शोषित, पीडित आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठीच डाव्या चळवळी अंतर्गत राज्यात विविध संघटना विविध प्रश्नांसंदर्भात शासनाशी लढा देत असतात. या संघटना आपापल्या मार्गानेच वाटचाल करीत आहेत. त्यामुळे दलित हत्याकांड, महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार यातून त्यांचे मोठे आर्थिक, मानसिक नुकसान होते. या बाबींकडे दुर्लक्ष होते की काय? या जाणीवेतून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व डावे पक्ष, त्यामध्ये काम करणाऱ्या संघटनांनी एका छताखाली येऊन सामाजिक अन्यायाविरुद्ध एक भक्कम ‘वज्रमूठ’ तयार करण्याचा चंग बांधला आहे.
८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पुतळ्याजवळ सर्व डाव्या पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहून पाखार्डी येथे झालेल्या दलित हत्याकांडाचा निषेध मोर्चा काढणार आहेत. त्यानंतर अशा सामाजिक घटनाविरोधात आवाज उठविण्यासाठी आणि यासंबंधी उभारण्यात येणाऱ्या लढ्याची दिशा ठरविण्यासाठी बैठकही होणार आहे. तसेच अशा समाज विघातक समस्यांविरोधात लढा उभा करण्यासंबधी २९ नोव्हेंबरला सर्वसमावेशक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचेही नियोजन ८ रोजी होणाऱ्या बैठकीत केले जाणार आहे.