डाव्यांनी लढणे सोडल्याने निवडणूक विसरले, एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यावर होती पकड
By राजाराम लोंढे | Published: October 23, 2024 01:51 PM2024-10-23T13:51:38+5:302024-10-23T13:52:41+5:30
संघटनात्मक बांधणीत अपयश : नव्या नेतृत्वाने मरगळ झटकण्याची गरज
राजाराम लोंढे
कोल्हापूर : एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या डाव्या पक्षांची आज अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी लढणेच सोडून दिल्याने त्यांना निवडणुकांचा विसर पडला की काय? अशी चर्चा सुरू आहे. काळानुरूप नवीन नेतृत्व तयार करून संघटनात्मक बांधणी करणे अपेक्षित होते; पण तसे झाले नसल्यानेच विशेषता शेतकरी कामगार पक्ष, जनता दलाची ताकद कमी झाली आहे.
साधारणता ५० वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्हा म्हणजे डाव्या पक्षांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, ‘भाकप’, ‘माकप’ने या पक्षांनी जिल्ह्याला आमदार, खासदार दिले. ‘लाल टोपी’चा दबदबा राजकारणावर होता. त्याच कालावधीत काँग्रेसची लाट आल्यानंतरही ‘डाव्या’ पक्षांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम केले.
विधानसभेच्या १९७२ च्या निवडणुकीत कोल्हापुरातून त्र्यंबक कारखानीस हे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतरच्या काळात एकाचे तीन आमदार निवडून आणून आपला करिष्मा दाखवून तर दिलाच; पण १९७८, १९८०, १९८५, १९९०, १९९५ व १९९९ मध्ये डाव्या पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळात प्रतिनिधित्व केले; पण त्यानंतर अनेकजण निवडणुकीला सामोरे गेले; पण एकालाही यश मिळाले नाही. डाव्या पक्षांत नवे नेतृत्व उदयास आले आहेत; पण त्यांनी मरगळ झटकण्याची गरज आहे.
२५ वर्षांपूर्वी डाव्यांवर गुलाल
विधानसभेच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत प्रत्येक वेळी ‘शेकाप’, ‘जनता दल’, ‘भाकप’, ‘माकप’ या डाव्या पक्षांनी उमेदवार दिले; पण १९९९ ला संपतराव पवार यांच्या रूपाने शेवटचा गुलाल डाव्या पक्षांना मिळाला होता.
नवीन पिढीची चळवळीकडे पाठ
‘डावे’ म्हणजे सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकऱ्यांचे पक्ष अशीच त्यावेळी धारणा होती; पण ज्यावेळी पक्षाची हुकमत होती, त्यावेळी तरुण नेतृत्वाला अपेक्षित संधी न मिळाल्याने पक्षवाढीला मर्यादा आल्याचे बोलले जाते. त्यामुळेच नवीन पिढीने चळवळीकडे पाठ फिरवली.
आतापर्यंत ‘डाव्या’ पक्षांचे झालेले आमदार
निवडणूक - मतदारसंघ - विजयी उमेदवार - पक्ष
१९७२ - कोल्हापूर - त्र्यंबक कारखानीस - शेकाप
१९७८ - इचलकरंजी - शिवगोंडा पाटील - कम्युनिस्ट
१९७८ - कोल्हापूर - रवींद्र सबनीस - जनता पक्ष
१९७८ - वडगाव - नानासाहेब माने - जनता पक्ष
१९८० - शिरोळ - दिनकरराव यादव - शेकाप
१९८५ - सांगरुळ - गोविंदराव कलिकते - शेकाप
१९८५ - गडहिंग्लज - श्रीपतराव शिंदे - जनता दल
१९९० - इचलकरंजी - के. एल. मलबादे - माकप
१९९० - राधानगरी - शंकर धोंडी पाटील - जनता दल
१९९० - गडहिंग्लज - श्रीपतराव शिंदे - जनता दल
१९९५ - सांगरुळ - संपतराव पवार - शेकाप
१९९९ - सांगरुळ - संपतराव पवार - शेकाप
अजूनही येथे आहे डाव्यांची ताकद :
‘करवीर’, ‘राधानगरी’, ‘शाहूवाडी’, ‘काेल्हापूर दक्षिण’, ‘कागल’, ‘कोल्हापूर उत्तर’, ‘इचलकरंजी’.
जुन्या-नव्यांचा मिलाफ करत पक्ष मजबुतीच्या दृष्टीने आम्ही पाऊले टाकली आहेत. आगामी काळात तुम्हाला मजबूत पक्ष म्हणून ‘शेकाप’ दिसेल. - बाबासाहेब देवकर (राज्य सहचिटणीस, शेकाप)
सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याचे काम आतापर्यंत डाव्या पक्षांनी केले. मात्र, दुर्दैवाने निवडणुकीच्या रिंगणात यश मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला सत्तेपेक्षा गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. - चंद्रकांत यादव (ज्येष्ठ नेते, माकप)