ऊस आंदोलनासह विधान परिषदेचे राजकारण तापले

By admin | Published: December 15, 2015 10:54 PM2015-12-15T22:54:07+5:302015-12-15T23:42:38+5:30

स्वाभिमानी आक्रमक : निवडणुकीत शिरोळ तालुका किंगमेकर ठरणार

Legislative politics of the cane movement washed up | ऊस आंदोलनासह विधान परिषदेचे राजकारण तापले

ऊस आंदोलनासह विधान परिषदेचे राजकारण तापले

Next

संदीप बावचे -- जयसिंगपूर -संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात ऊस बिलाबरोबरच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. ऊसबिलाचा तोडगा निघाला असला तरी ८०/२० फॉर्म्युल्याचा तोडगा अद्याप सुटलेला नाही. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे, तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिरोळ तालुका किंगमेकर ठरणार असल्याने दोन्ही उमेदवारांनी या तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तालुक्यात ऊसदर व विधानपरिषदेचे राजकारण चांगलेच तापले आहे.जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी ५ डिसेंबरचा अल्टिमेटम शासन व कारखानदारांना दिला होता. शासनपातळीवर बैठक होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. ११ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य साखर संघाचे अध्यक्ष व शेतकरी संघटनांचे नेते, साखर कारखान्यांना पतपुरवठा करणाऱ्या बॅँकांचे प्रतिनिधी यांची बैठक होऊन ८०/२० फॉर्म्युल्याने ऊस बिल देण्याचा तोडगा काढण्यात आला. ज्या कारखान्याला जितकी एफआरपी बसेल त्याच्या ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना ऊस तोडणी झाल्यानंतर १४ दिवसांत देण्याचा व २० टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर देण्याचा निर्णय झाला होता. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही हिरवा कंदील दाखवीत १३ डिसेंबरचे चक्का जाम आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप सर्वच कारखानदारांनी याबाबत मौन बाळगले आहे. काही कारखाने १७०० रुपयेप्रमाणे दर देण्याबाबत हालचाली करीत असल्याची कुणकुण लागताच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांच्या विभागीय शेती कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन केले. तसेच १६ डिसेंबरपासून ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिला आहे.शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यासाठी नागपूर विधानभवन परिसरात घोषणाबाजी करून निदर्शने केली होती. स्वाभिमानीबरोबर शिवसेनाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार पाटील यांनी दाखवून दिले होते.



शेतकरी चिंताग्रस्त
जिल्ह्यातील नेते विधानपरिषदेच्या राजकारणात व्यस्त असताना शेतकरी मात्र ऊस बिलाच्या चिंतेने ग्रस्त झाला आहे. स्वाभिमानीने आजपासून पुन्हा ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिल्याने व विधानपरिषद निवडणुकीच्या राजकारणावरून शिरोळ तालुका चांगलाच तापला आहे.


ऊसपट्ट्यात टोकाचा संघर्ष
ऊसपट्ट्यात कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक सरळ लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. तालुक्यात ५३ मतदार असून, उमेदवाराच्या विजयात तालुका किंगमेकर ठरणार आहे. जयसिंगपूर पालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे २३ व अपक्ष दोन नगरसेवक आहेत, तर कुरुंदवाड पालिकेत १९ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेच्या आठपैकी पाच स्वाभिमानी, दोन कॉँग्रेस व एक राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. पंचायत समिती सभापतिपद स्वाभिमानीकडेच आहे. असे एकूण ५३ मतदार असल्याने जिल्ह्यातील नेतेमंडळींचे लक्ष याच तालुक्याकडे लागले आहे. विधानपरिषदेच्या गोळाबेरजेत उमेदवार कितपत यशस्वी होतात, शिवाय आगामी नगरपालिका निवडणुकीतील डावपेच कसे राहतात, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.

Web Title: Legislative politics of the cane movement washed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.