बिनविरोधामागे विधान परिषदेची तयारी
By admin | Published: August 4, 2015 11:56 PM2015-08-04T23:56:41+5:302015-08-04T23:56:41+5:30
वडगाव बाजार समिती : आगामी निवडणुकीसाठी महादेवराव महाडिक यांची खेळी
आयुब मुल्ला-खोची -वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात आमदार महादेवराव महाडिक यांना यश आले. यासाठी सर्व गटांना बरोबर घेताना बरीच कसरत करावी लागली. स्वत:च्या गटाला अपेक्षेपेक्षा कमी जागा घेत बिनविरोधाचा खेळ यशस्वी करण्यामागे विधान परिषदेचे गणित असून, त्यांनी सहकाऱ्यांसह सर्वांनाच खूश केले. माजी खासदार निवेदिता माने यांच्या गटाला हक्काची एक जागा मिळाली नाही. त्यामुळे माने गट व शिवसेना यांना संचालकपदाची संधी मिळाली नाही.या समितीची वर्षाला सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल आहे. या समितीवर बरीच वर्षे स्वर्गीय आमदार रत्नाप्पाण्णा कुंभार व शामराव पाटील-यड्रावकर गटाची सत्ता होती. त्यानंतर महाडिक यांचेच वर्चस्व राहिले आहे. इतर गटांपेक्षा आवाडे यांच्या गटाला जास्त जागा देत त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. यावर्षी मात्र सर्वच गटांनी अर्ज दाखल केले. तत्पूर्वी महाडिक यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाडे गटाला सहा, जनसुराज्यला दोन, तर माने गटाला एक व उर्वरित दहा जागा आपल्या गटाला देण्याचे सूत्र ठरविले होते.मात्र, हे सूत्र टिकले नाही. यात बदल करण्याची वेळ त्यांच्यावर आली. शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजप तसेच शिवसेना आपल्याला विचारातच घेत नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करावयास लावले. अंतिम टप्प्यात माजी खासदार जयवंतराव आवळे यांनीही तोच निर्णय घेतला. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या शतकाच्यावर गेली.यामुळे महाडिक यांची अडचण झाली. इतरांसाठी स्वत:च्याच जागा कमी करणे हाच पर्याय त्यांच्यासमोर राहिला. त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवित यड्रावकर, आवळे, भाजप यांना प्रत्येकी एक जागा दिली. माने गटाला मात्र शेवटच्या टप्प्यात डच्चू दिला. जे दोन संचालक महाडिक यांना मानतात ते माने यांनाही मानतात. त्या दोघांना माने गटाचे समजा असाच अप्रत्यक्ष सल्ला राजकारणात दिला. परंतु, त्यामुळे त्यांना दोन्ही गटांचे समजा असेच चित्र निर्माण झाले.
आठ जागा घेण्याचेही राजकारण
महाडिक यांच्या कार्यकर्त्यांना आठ जागांवर समाधान मानावे लागले. तालुक्याच्या पश्चिम भागात असणारी ही समिती इथल्या कार्यकर्त्यांपेक्षा उत्तरेला जास्त संधी देणारी ठरली आहे. बिनविरोध निवडीमागे विधान परिषदेचे गणित सोपे व्हावे, असा उद्देश असल्याचेही बोलले जाते.