यंत्रमागाच्या अनुदानासाठी आमदारांची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 10:20 PM2016-08-29T22:20:30+5:302016-08-29T23:19:00+5:30
वस्त्रोद्योगमंत्र्यांचे आश्वासन : वीज दर सवलत व व्याजाच्या अनुदानाकडे वस्त्रनगरीतील यंत्रमागधारकांचे लक्ष
राजाराम पाटील - इचलकरंजी --आर्थिक मंदीमध्ये भरडल्या जाणाऱ्या यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था यावी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी या उद्योगासाठी एक रुपया प्रतियुनिट वीज सवलत व कर्जावर पाच टक्के व्याज दराचे अनुदान असा उपाय शासन ताबडतोब अमलात आणेल, अशी ग्वाही येथील वस्त्रोद्योग परिषदेत दिली. आमदार सुरेश हाळवणकर यांनी विशेष प्रयत्न करून ‘मंत्री आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आता मंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाठपुरावा करून त्याचा फायदा प्रत्यक्ष यंत्रमागधारकांना मिळवून देण्यामध्ये आमदारांची कसोटी लागणार आहे.
वस्त्रोद्योगाला गेले वर्षभर आर्थिक मंदीने सतावले आहे. देशातील एकूण यंत्रमागांपैकी निम्म्याहून अधिक तेरा लाख यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यात शेतीनंतर मोठा रोजगार पुरविणारा वस्त्रोद्योग-यंत्रमाग उद्योग आहे. कापूस - सूतगिरण्या - यंत्रमाग - प्रोसेसिंग - गारमेंट अशी परिपूर्ण साखळी वस्त्रोद्योगात आहे. अशा वस्त्रोद्योगात राज्यात एक कोटी जनता प्रत्यक्ष काम करीत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या उद्योगावर पूर्वीप्रमाणेच विशेष लक्ष दिले पाहिजे.
यंत्रमाग उद्योगातील सातत्याच्या मंदीमुळे कर्जबाजारी झालेल्या दत्ता धंदले या यंत्रमागधारकाने २६ जूनला आत्महत्या केल्याने वस्त्रनगरीमध्ये खळबळ उडाली. ‘लढा जगण्याचा’ या बॅनरखाली यंत्रमागधारकांनी पाच दिवस धरणे आंदोलन केले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात, तर खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केला. त्यानंतर यंत्रमागधारकांच्या चारही संघटनांनी यंत्रमाग उद्योगात आलेल्या अभूतपूर्व मंदीवर उपाय सूचविण्यासाठी खासदार शेट्टी, आमदार हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, आदींची बैठक ६ आॅगस्टला रोटरी क्लबमध्ये झाली. यंत्रमागाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी स्थापन केलेल्या कृती समितीचे निमंत्रक खासदार शेट्टी व सहनिमंत्रक आमदार हाळवणकर झाले.
खासदार शेट्टींनी यंत्रमागाच्या विविध समस्यांबाबत विचारविनिमय करणारी एक बैठक केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे २२ आॅगस्ट रोजी लावली. तर त्यापाठोपाठच आमदार हाळवणकर यांनी २७ आॅगस्टला वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांना थेट इचलकरंजीत आणले. अशाप्रकारे यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांना गती आली आहे. यापूर्वी आमदार हाळवणकर यांनी यंत्रमाग क्षेत्रासाठी सवलतीचा वीज दर असावा, याकरीता शासनाकडे जोरदार प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून यंत्रमागाला वीज दर फरकात स्वतंत्र वर्गवारी मिळाली आणि २ रुपये ६६ पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्याचे शासनाने मान्य केले. आता वस्त्रोद्योगमंत्र्यांनी या वीज दरामध्ये आणखीन एक रुपयांची सवलत देण्याबरोबरच यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याज अनुदान देण्यात येईल, असे वस्त्रोद्योग परिषदेमध्ये जाहीर केले आहे. हे अनुदान १ जुलैपासून देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आमदार हाळवणकर यांच्या जबाबदारीमध्ये मोठी वाढ झाली असून, वस्त्रोद्योग मंत्र्यांची घोषणा लवकरात लवकर यंत्रमागधारकांच्या पदरात पाडून देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.
थेट लाभ यंत्रमागधारकांना मिळावा : महाजन
शासनाने दिलेल्या सवलतींचा लाभ छोट्या यंत्रमागधारकांना मिळण्यासाठी वीज दर किंवा अन्य प्रकारच्या अनुदानाचा थेट लाभ होण्यासाठी यंत्रमागधारकांच्या बॅँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात यावी; अन्यथा त्याचा लाभ परस्परपणे व्यापाऱ्यांकडून लाटला जातो. याचाही पाठपुरावा शासनाकडे झाला पाहिजे, अशी अपेक्षा यंत्रमागधारक कृती समितीचे विनय महाजन यांनी व्यक्त केली.