बहर लांबल्याने लिंबू महाग
By admin | Published: October 23, 2014 09:18 PM2014-10-23T21:18:34+5:302014-10-23T22:53:20+5:30
वातावरणात बदल : उत्पादन घटल्याने नगास चार ते पाच रुपये दर
सांगली : गेल्यावर्षीचा तीव्र उन्हाळा आणि यंदा झालेला जोरदार पाऊस या वातावरणातील फरकाचा परिणाम लिंबू पिकावर झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. परिणामी दर गगनाला भिडले आहेत. चांगल्या दर्जाचा लिंबू प्रतिनग चार ते
पाच रुपये झाला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेला लिंबू हिरवा असून त्यात रसाचे प्रमाण अत्यल्प आहे.
सांगली, मिरज मार्केटमध्ये सोलापूर, पुणे जिल्ह्यातील दौंड, श्रीगोंदा आणि कर्नाटकमधून लिंबूची मोठ्या प्रमाणात आवक होते. परंतु, त्या भागात गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे लिंबूच्या बागा वाळून गेल्या. काही शेतकऱ्यांनी बागा वाळू दिल्या नाहीत; पण पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये मोहोर कमी प्रमाणात आला. त्यानंतर मृग नक्षत्रातही कमी बहर आला.
आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस अजूनही जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात सुरूच आहे. जादा पावसामुळे लिंबूच्या झाडांवर तांबेरा, ठिपक्या रोग पडल्याच्या तक्रारी आहेत. जादा पावसामुळे झाडाच्या मुळ्या दबल्यामुळे फळांमध्ये पुरेसा रस तयार होत नाही.
लिंबूची टंचाई असल्यामुळे शेतकरी केवळ हिरवट लिंबूचीच बाजारात विक्री करू लागले आहेत. हिरव्या लिंबूचे दरही गगनाला भिडले आहेत. सांगलीच्या बाजारात तर लिंबूची विक्री प्रतिनग चार ते पाच रुपयाने होत आहे.
बाजारामध्ये सध्या चांगले पिकलेले दोन लिंबू दहा रुपयांना मिळत आहेत. याचा फटका नागरिकांंसह हॉटेल व्यावसायिक आणि लिंबू-सरबताची विक्री करणाऱ्या हातगाडीवाल्यांनाही बसला आहे. (प्रतिनिधी)
विविध रोगांचा प्रादुर्भाव
आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात सुरू आहे. याचा परिणाम लिंबूच्या बागांवर झाला आहे. झाडांवर तांबेरा, ठिपक्या या रोगांनी आक्रमण केले आहे. तसेच पावसाने फळांमध्ये रस तयार झालेला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पूर्वी हॉटेलमध्ये कांदा, टोमॅटोचे दर वाढल्यानंतर भाजीतून ते गायब होत असे. छोटे हॉटेल व्यावसायिक तर कांदाभजी करणेच टाळत. गेल्या दहा वर्षांत हॉटेल व्यावसायिकांना कधीच लिंबूची टंचाई जाणवली नाही. मात्र सध्या एक लिंबू चार ते पाच रुपयाला मिळत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची कोंडी झाली
आहे, अशी प्रतिक्रिया सांगलीतील हॉटेल व्यावसायिक दौलतराव घोरपडे यांनी दिली.
वातावरणातील बदलामुळे लिंबूचे उत्पादन घटले असून, रोगही पडला आहे. शेतकऱ्यांनी पाणी कमी प्रमाणात देऊन मायक्रोन्युट्रेड खताचा वापर करण्याची गरज आहे.
- आर. जे. भोसले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.
उन्हाळ्यामुळे लिंबूच्या अनेक बागांना पुरेसे पाणी मिळाले नाही. यामुळे मोहर, मृगाच्या काळात लिंबूच्या झाडांना कळीच आली नाही. सध्या कळी आली आहे, पण जादा पावसामुळे तांबेरा रोग पडला असून, फळावर ठिपके पडले आहेत.
- भरत तळंगे, आरग (ता. मिरज)