‘त्या’ बिबट्याचा मृत्यू उपासमारीने

By admin | Published: January 2, 2015 11:38 PM2015-01-02T23:38:17+5:302015-01-03T00:12:25+5:30

शवविच्छेदनानंतर निष्कर्ष : नागरिकांनी केलेल्या गोंधळाचाही धक्का

'That' Leopard died of starvation | ‘त्या’ बिबट्याचा मृत्यू उपासमारीने

‘त्या’ बिबट्याचा मृत्यू उपासमारीने

Next

शिराळा : कोल्हापूर येथे जेरबंद केलेल्या बिबट्याचा चांदोली अभयारण्यात नेताना गुरुवारी (दि. १) मृत्यू झाला होता. तीन-चार दिवसांपासून उपाशी असल्याने आणि नागरिकांनी केलेल्या गोंधळाचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता शवविच्छेदन अहवालात व्यक्त करण्यात आली.
गुरुवारी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी नेत असताना, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. वनक्षेत्रपाल भरत माने यांनी त्याला तपासले असता, तो मृत झाल्याचे निदर्शनास आले.
डॉ. सुहास देशपांडे यांनी चांदोली अभयारण्यातील झोळंबीजवळ असणाऱ्या जनीचा आंबा येथे त्याचे विच्छेदन केले. बिबट्या दोन-चार दिवस उपाशी होता. शिवाय त्याला पकडताना नागरिकांनी मोठा गोंधळ केला. उपासमार आणि गोंधळामुळे बिबट्याचे हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याचे डॉ. देशपांडे यांनी शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. शवविच्छेदनाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर जनीचा आंबा येथे चांदोली राष्ट्रीय उद्यानातच बिबट्याचे दहन करण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक विजय भोसले, उपवनसंरक्षक रंगराव नाईकडे, प्रादेशिकचे वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर उपस्थित होते.
अशा प्रकारे बिबट्याचा मृत्यू होण्याची चांदोलीतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर २०१४ रोजी खेड तालुक्यातील आपनीमेटा येथून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी आणलेल्या पाच ते साडेपाच वर्षांच्या नर जातीच्या बिबट्याचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. (वार्ताहर)


‘प्रजासत्ताक’ची कारवाईची मागणी
रुईकर कॉलनीत घुसलेल्या बिबट्याला काल, गुरुवारी चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी जबाबदार असलेल्या वन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी प्रजासत्ताक संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलने केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई व सचिव बुरहान नाईकवडी यांनी दिली.

Web Title: 'That' Leopard died of starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.