पन्हाळगडावरील होळकरांच्या बंगल्यात शिरला बिबट्या, कुत्र्याने केला प्रतिकार; घटना सीसीटिव्हीत कैद
By संदीप आडनाईक | Published: July 8, 2023 11:25 AM2023-07-08T11:25:00+5:302023-07-08T11:25:43+5:30
कोल्हापूर : पन्हाळा येथील डॉ. राज होळकर यांच्या तबक उद्यानाच्या बाजूला असलेल्या बंगलीत शिरून शनिवारी मध्यरात्री बिबट्याने दोन कुत्र्यांवर ...
कोल्हापूर : पन्हाळा येथील डॉ. राज होळकर यांच्या तबक उद्यानाच्या बाजूला असलेल्या बंगलीत शिरून शनिवारी मध्यरात्री बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला. एका कुत्र्याने प्रतिकार केल्याने या बिबट्या पळाला. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. २०२१ मध्येही बिबट्या या बंगल्यात आला होता. त्यांनी पाळलेले आतापर्यंत २४ पाळीव कुत्रे बिबट्याची शिकार झाली आहेत.
शनिवारी मध्यरात्री एक वाजून २८ मिनिटांनी बिबट्याने डॉ. होळकर यांच्या बंगल्यात घरात शिरून दोन कुत्र्यावर हल्ला केला. परंतु डॅंगो नावाच्या पाळीव कुत्र्याने त्याला प्रतिकार केला. डॉ. होळकर यांना याची चाहूल लागताच लाईट लावून ते बाहेर आल्यामुळे बिबट्या पळून गेला.
आत्तापर्यंत त्यांच्या या डॅंगो कुत्र्यावर बिबट्याने चार वेळा हल्ला केला आहे, परंतु त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो चारही वेळा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला आहे. परंतु या झटापटीत त्यांची दुसरी "पाहुणी" नावाची कुत्री पळून गेली. बिबट्या तिच्या मागे धावत गेला.ती अजून परत आलेली नाही, त्यामुळे तिला बिबट्याने पकडले असावे. २०२१ मध्येही बिबट्याने या बंगल्यात शिरून कुत्र्यावर झडप घातली होती. आतापर्यंत २४ कुत्र्यांची बिबट्याने शिकार केली आहे.