वनविभागाच्या सापळ्यामध्ये बिबट्या जेरबंद; सिध्दोबाच्या डोंगरात ४ महिन्यांपासून होता ठाण मांडून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:35 AM2023-04-05T10:35:33+5:302023-04-05T10:36:43+5:30
या सापळ्यात बिबट्यास अकर्षीत करण्यासाठी खाद्य ठेवुन सापळा लपवुन ठेवला होता.
शिरोली: तासगांव(ता.हातकणंगले) येथील जानेवारी महिन्यापासून सिध्दोबाच्या डोंगरात गेल्या चार महिन्यांपासून ठाण मांडून बसलेला बिबट्या मंगळवारी वनविभागाच्या सापळ्यामध्ये जेरबंद झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
मौजे तासगांव येथे महेश पाटील यांचे गोसंजीवनी गाेशाळा आहे. या गोशाळेत शंभर पेक्षा अधिक गायींचे पालन केले जाते. या गोशाळेच्या दक्षिण बाजुस घनदाट जंगल व दरी आहे.
जानेवारी महिन्यात या गो शाळेतील गायीच्या एका बछड्यावर बिबट्याने झडप घालुन त्याला जंगलात ओढत नेले.व त्याला ठार मारले. हे बछडे अर्धवट खाल्याच्या अवस्थेत गोशाळेतील कामगारांना दिसुन आले. यानंतर त्यांनी वनविभागास त्याची माहिती दिली.वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी कॅमॅरे लावुन बिबट्या असल्याची खात्री केली. त्यानंतर वनविभागाची बचाव पथकाने बिबट्या येत असल्याच्या मार्गावर लोखंडी सापळा लावला होता. या सापळ्यात बिबट्यास अकर्षीत करण्यासाठी खाद्य ठेवुन सापळा लपवुन ठेवला होता.
वनविभागाची टिम काही दिवस लक्ष ठेवून होती. मात्र बिबट्या तिकडे फिरकला नव्हता तीन महिन्यानंतर मंगळवारी रात्री अखेर स्वतःहून पिंजऱ्यात जेर बंद झाला. मौजे तासगाव येथील गो संजीवनी शाळा असलेल्या ठिकाणी सापडलेला बिबट्या हा वनविभागाने त्याला निर्जन व नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. असे वनक्षेत्रपाल आर एस कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी वनपाल एस एस जाधव, विजय पाटील यांच्यासह वन्यजीव बचाव पथकात प्रदिप सुतार,अमोल चव्हाण,विनायक माळी,असुतोष सुर्यवंशी,अलमतीन बांगी व मोजे तासगावची ग्रामस्थ यांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.