राखण करायला गेले गव्यांची अन् समोर आला बिबट्या, शेतकऱ्यांची उडाली भांबेरी; पश्चिम पन्हाळा परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 03:58 PM2022-02-26T15:58:55+5:302022-02-26T16:31:24+5:30
बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. ...
बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. पन्हाळा पश्चिम परिसरातील पिसात्री येथे वनखात्याच्या जंगलानजिक असलेल्या खीरसागर नावाच्या शेतात काल, शुक्रवारी (दि.२५) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळ पन्हाळा परिसरात शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, पिसात्री येथील नाथा भाऊ पाटील व पांडूरंग पाटील हे शेतकरी नेहमी प्रमाणे खीरसागर नावाच्या ऊस शेतीचे राखण करणेसाठी गेले होते. दुचाकी थांबवून दोघेही शेताकडे जात असताना बॕटरी प्रकाश मात्रातच अचानक बिबट्या समोर आला. त्यामुळे या दोघां शेतकऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.
प्रसंगावधान राखत त्यांनी बॕटरी बंद केली. यावेळी दोघेही हळुवार शेतात राखणेसाठी तयार केलेल्या माचावर जावून बसले व फोन करुन घरच्यांना याबाबत माहिती दिली. भितीपोटी राखण सोडून सर्वांनी घरचा रस्ता धरला. काही दिवसापुर्वी या परिसरातील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले होते. यानंतर आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
पन्हाळा पश्चिम भागात गव्यांचा वावर
पन्हाळा पश्चिम भागात गव्याचा मोठा उपद्रव आहे. शेतात शिरुन गव्याचे कळप मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करत आहेत. त्यामूळे सर्व शेतकरी शेताची राखण करणेसाठी शेतात जातात. मात्र गव्यांची राखण करताना वाघ दिसल्याने शेतकरी वर्ग भितीच्या छायेखाली आहे .