धावत्या दुचाकीवर बिबट्याची झेप
By Admin | Published: October 15, 2015 12:06 AM2015-10-15T00:06:09+5:302015-10-16T00:03:30+5:30
दोघे जखमी : म्हासोली ग्रामस्थांसह प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण
उंडाळे : कारखान्यातील काम आटोपून दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन कामगारांवर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये संबंधित कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. म्हासोली
(ता. कऱ्हाड) येथे ‘पवार मळा’ नावाच्या परिसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. सर्जेराव ज्ञानू मोरे (रा. जखिणवाडी, ता. कऱ्हाड) व उद्धव यशवंत पवार (रा. तांबवे, ता. कऱ्हाड) अशी जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तांबवे येथील उद्धव पवार व जखिणवाडी येथील सर्जेराव मोरे हे दोघेजण शेवाळेवाडी-म्हासोली येथील रयत कारखान्यात कामाला आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ड्युटी संपल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून कऱ्हाडच्या दिशेने निघाले, ते म्हासोली गावच्या हद्दीतील ‘पवार मळा’ नावच्या परिसरात आले असताना रस्त्याकडेला दुचाकीच्या प्रकाशात एका प्राण्याचे डोळे चमकताना त्यांना दिसले. मात्र, कोल्हा अथवा कुत्रा असावा, असा समज होऊन सर्जेराव व उद्धव यांनी दुचाकी न थांबविता पुढे आणली; मात्र रस्त्याकडेला थांबलेल्या बिबट्याने अचानक त्या दोघांवर झेप घेतली. त्यामुळे तोल जाऊन सर्जेराव व उद्धव दुचाकीसह खाली कोसळले. त्यावेळी बिबट्याने दोघांवर झडप घातली.
दरम्यान, त्याचवेळी कृष्णात शिंदे व बाळकृष्ण पाटील हे दुसऱ्या दुचाकीवरून पाठीमागून आले. त्यांनी हा प्रकार
पाहिला. दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून नजीकच्या झाडीत धूम ठोकली. कृष्णात शिंदे व बाळकृष्ण
पाटील यांनी जखमी सर्जेराव व
उद्धव यांना उपचारार्थ उंडाळेच्या
ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे म्हासोली परिसरात नागरिकांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)
अनेक महिन्यांपासून वावर
म्हासोली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. ठिकठिकाणी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.