Kolhapur: राधानगरी अभयारण्यातील प्राणिगणनेत वाघ, बिबट्यांचे दर्शनच नाही

By संदीप आडनाईक | Published: May 24, 2024 06:18 PM2024-05-24T18:18:13+5:302024-05-24T18:28:20+5:30

गणनेत नोंदवलेले पशुपक्षी किती व कोणते.. जाणून घ्या

Leopards, tigers not seen in Radhanagari sanctuary census Kolhapur | Kolhapur: राधानगरी अभयारण्यातील प्राणिगणनेत वाघ, बिबट्यांचे दर्शनच नाही

Kolhapur: राधानगरी अभयारण्यातील प्राणिगणनेत वाघ, बिबट्यांचे दर्शनच नाही

कोल्हापूर : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी बुध्दपौर्णिमेला रात्री पूर्णचंद्राच्या साक्षीने राधानगरी अभयारण्यातील पाणवठ्यावर घेतलेल्या प्राणिगणनेत ३० वेगवगळ्या प्रजातींच्या १८५ पशुपक्ष्यांचेच दर्शन झाले. यामध्ये ७१ रानगवे, १७ रानकुत्रे, ९ अस्वले, ४ सातभाई, १ गरुड, साळिंदर, वानर, १ शिंगडा घुबड, १ धनेश, दुर्मिळ ३ उदमांजरांसह इतर पशुपक्ष्यांचे दर्शन झाले. दोन दिवसाच्या गणनेत हत्ती, बिबट्या आणि वाघाचे दर्शन मात्र प्रगणकांना झाले नाही.

कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत राधानगरी अभयारण्यात २२ आणि २३ मे रोजी मध्यरात्री ही प्राणीगणना झाली. या गणनेसाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस. रामानुजम, कोल्हापूर वनपरिक्षेत्र अधिकारी जी. गुरुप्रसाद तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आणि वन्यजीवचे विभागीय वन अधिकारी एस. एस. पवार यांचे सहकार्य लाभले.

या गणनेत निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, त्यांचे आवाज, वनसंपदा तसेच जैवविविधतेचा अनुभव घेता आला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या प्राणीगणनेस उदंड प्रतिसाद मिळाला. जनसामान्यांना वन्यप्राणी तसेच जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभाग करत असलेल्या कामाची जवळून माहिती घेता आली.

राधानगरी अभयारण्यातील जंगल भागात विविध ठिकाणांवरील पाणवठ्यावर यासाठी २६ मचाण बांधलेली होती. रात्रीच्या वेळेस येणारे वन्यप्राणी प्रत्यक्षात पाहून ही गणना करण्यात आली. यात वनविभागाचे ५० अधिकारी, वनकर्मचारी तसेच २६ प्रगणक स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.

अशी झाली गणना

या प्रगणनेत वाघांच्या पायाचे ठसे, विष्ठा, शिकारीचे प्रकार आदींचा अभ्यास करुन माहिती संकलित केली. पाणवठ्यावर येणारे प्राणी, त्यांच्या विष्ठा सर्वेक्षण तसेच झाडांवरील त्यांच्या हस्तक्षेपाच्या नोंदी केल्या आहेत. प्राण्यांच्या हालचालींचा अंदाज घेण्यासाठी "डिस्टन्स सॅम्पलिंग" ही लाइन ट्रान्सेक्ट सॅम्पलिंग ही शास्त्रीय पध्दत वापरली.

गणनेत नोंदवलेले पशुपक्षी

रानगवा ७१, रानकोंबडा २२, ससा ६, भेकर ५, उदमांजर २, वटवाघूळ १, शिंगडा घुबड १,घुबड २, गरुड १, साळींदर १, मोर ९, घोणस १, वानर १, सांबर ५, शेकरु ५, चिमणी ३, डुक्कर ५, घार १, गेळा १, रानडुक्कर १, कापूगोडा १, अस्वल ९, वेडा राघू १, सातभाई ४, कासव २, खंड्या १, रानकुत्रा ११, मुंगूस १, धनेश १ व इतर ३ पक्षी.

Web Title: Leopards, tigers not seen in Radhanagari sanctuary census Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.