कुष्ठरोगी बांधवांना माणूस म्हणून वागवा : उपमहापौर शेटे यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:35 AM2019-07-09T11:35:50+5:302019-07-09T11:37:26+5:30
कुष्ठरोग हा शाप नसून इतर रोगाप्रमाणे तोही एक रोग आहे. नियमित औषधोपचारानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून समाजाने कुष्ठरोगी बांधवांना वाळीत न टाकता माणूस म्हणून वागविले पाहिजे, असे आवाहन उपमहापौर भूपाल शेटे यांनी केले.
कोल्हापूर : कुष्ठरोग हा शाप नसून इतर रोगाप्रमाणे तोही एक रोग आहे. नियमित औषधोपचारानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून समाजाने कुष्ठरोगी बांधवांना वाळीत न टाकता माणूस म्हणून वागविले पाहिजे, असे आवाहन उपमहापौर भूपाल शेटे यांनी केले.
जवाहरनगर येथील उपमहापौर शेटे कुटुंबीयांतर्फे गेली २८ वर्षे कुष्ठरोगी बांधवांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप केले जाते. यावर्षीही स्वाधारनगर येथील ६५ विद्यार्थ्यांना भूपाल शेटे व त्यांच्या पत्नी शशिकला शेटे यांच्या हस्ते स्वखर्चातून शालेय साहित्य वाटण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कुष्ठरोग हा संसर्गजन्य, तसेच आनुवंशिक असल्याचा गैरसमज आहे; मात्र हा गैरसमज अत्यंत चुकीचा आहे. तो आनुवंशिक असता तर कुष्ठरोगींची मुले हा रोग घेऊनच जन्माला आली असती; पण तसे काही घडलेले नाही. कुष्ठरोगींची मुलेही सामान्य मुलांप्रमाणेच आहेत. जर हा रोग संसर्गजन्य असता, तर तो मला झाला असता; कारण मी त्यांच्यासोबत गेली ४0 वर्षे काम करत आहे; त्यामुळे हा गैरसमजदेखील चुकीचा आहे, असे शेटे यांनी सांगितले.
निसर्गाच्या कोपामुळे त्यांच्या आयुष्यात कुष्ठरोग झाला. अनेक कुष्ठरोगी पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना काम करून जीवनाचा चरितार्थ चालवायचा आहे; मात्र समाज अजूनही त्यांना स्वीकारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. म्हणूनच समाजाने त्यांना माणूस म्हणूनच वागविले पाहिजे, त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी भूपाल शेटे, माजी नगरसेविका शशिकला शेटे यांच्या हस्ते ६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जयंत लाटकर, बापू जाधव, प्रसाद शेटे, नितीन पोवार, शिवाजी पंदारे, शिरीष कारंडे, रवी बामणेकर, युवराज घाडगे, रोहित बागडेकर उपस्थित होते.