अकरावी प्रवेशासाठी गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:39+5:302021-09-02T04:49:39+5:30
कोल्हापूर : यंदा शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेसाठी एकूण ९८०६ विद्यार्थ्यांनी ...
कोल्हापूर : यंदा शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेसाठी एकूण ९८०६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. यावर्षी एकूण प्रवेशक्षमता १४६८० इतकी आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी करून दि. ७ सप्टेंबर रोजी निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
केंद्रीय समितीच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या (www.dydekop.org) या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया दि. २५ ऑगस्टपासून सुरू झाली. या प्रक्रियेची मुदत मंगळवारी संपली. या मुदतीत एकूण ९८०५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अखेरच्या दिवशी एकूण ३८९ जणांनी अर्ज केले. त्यात विज्ञान विद्याशाखेचे १८३, वाणिज्य मराठी ८०, वाणिज्य इंग्रजी ३३, कला मराठी ८६, तर कला इंग्रजी माध्यमाच्या सात अर्जांचा समावेश आहे. यावर्षी एकूण प्रवेशक्षमतेपेक्षा ४८७५ जागा रिक्त राहणार आहेत. त्यात विज्ञानच्या ४६३, वाणिज्य मराठीच्या १७१७, वाणिज्य इंग्रजीच्या २१६, कला मराठीच्या २४२८, तर कला इंग्रजी माध्यमाच्या ५१ जागांचा समावेश आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. अर्जांच्या छाननीची प्रक्रियेसह निवड यादी प्रसिद्धी आणि पुढील प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.
पॉंइंटर
शाखानिहाय प्रवेश क्षमतेच्या तुलनेत दाखल झालेले अर्ज
शाखा प्रवेश क्षमता एकूण अर्ज
विज्ञान ६००० ५५३७
वाणिज्य (मराठी) ३३६० १६४३
वाणिज्य (इंग्रजी) १६०० १३८४
कला (मराठी) ३६०० ११७२
कला (इंग्रजी) १२० ६९
प्रवेशाची पुढील प्रक्रिया अशी
दि. २ सप्टेंबरपर्यंत : अर्जांची छाननी
दि. ३ ते ६ सप्टेंबर : निवड यादी तयार करणे
दि. ७ सप्टेंबर : निवड यादीची प्रसिद्धी
दि. ७ ते ८ सप्टेंबर : तक्रार निवारणाची प्रक्रिया
दि. ८ ते १५ सप्टेंबर : प्रवेश निश्चित करणे
गेल्यावर्षी अशी होती स्थिती
अर्ज केलेले एकूण विद्यार्थी : १२६९१
दोन्ही फेऱ्यांमधील एकूण प्रवेशित विद्यार्थी : ६८७३
रिक्त राहिलेल्या जागा : ७८०७