पाठिंबा दिलेल्या सदस्यांनाही कमी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:12+5:302020-12-12T04:41:12+5:30
कोल्हापूर : आधीच्या भाजपच्या सत्ताकाळात त्यांच्यासोबत राहिलेल्या काही सदस्यांना पंधराव्या वित्त आयोगातून कमी निधी मिळाल्याने त्याची ...
कोल्हापूर : आधीच्या भाजपच्या सत्ताकाळात त्यांच्यासोबत राहिलेल्या काही सदस्यांना पंधराव्या वित्त आयोगातून कमी निधी मिळाल्याने त्याची चर्चा दिवसभर जिल्हा परिषदेत सुरू होती.
वित्त आयोगातून कुणाला किती मंजूर झाले याचे आकडे आता बाहेर आले आहेत. भाजपच्या शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करताना कॉंग्रेससह शिवसेनेच्या काही सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचाही एक सदस्य त्यावेळी अनुपस्थित होता. या पार्श्वभूमीवर पर्याय नसल्याने ज्यांनी सत्तांतरामध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांना पाठिंबा दिला त्यांना निधी कमी दिल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यामुळे यातील काहीजणांनी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये सोमवारी दुरुस्ती करण्याची मागणी या सदस्यांनी केली आहे. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीवरूनची धुसफूस अजून थांबलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे.