कोल्हापुरात पावसाची उघडीप; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:54 PM2024-07-30T12:54:09+5:302024-07-30T12:54:43+5:30

अद्याप ७७ बंधारे पाण्याखाली : राधानगरीतील विसर्गाने संथगतीने पाणी कमी

Less rain in Kolhapur district, The flood receded | कोल्हापुरात पावसाची उघडीप; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

कोल्हापुरात पावसाची उघडीप; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरण क्षेत्रात पाऊस असला तरी पुराची पातळी कमी होऊ लागली आहे. राधानगरीचे अद्याप दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पुराचे पाणी संथ गतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात १० इंचाने कमी झाली असून, दिवसभरात केवळ दोनच बंधारे मोकळे झाले आहेत. अद्याप ५३ मार्ग पाण्याखाली असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.

जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी सकाळपासून दोन-तीन जोरदार सरींचा अपवाद वगळता पूर्णपणे उघडीप दिली आहे. कोल्हापूर शहरात काही काळ ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पावसाने उघडीप दिल्याने दिवसभरात कोल्हापूर शहरातील पुराचे पाणी बऱ्यापैकी कमी झाल्याने काही रस्ते मोकळे झाले होते. जिल्ह्यात राज्य व प्रमुख जिल्हा असे ५३ मार्ग बंद होते. असे असले तरी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरुवात झाल्याने दूध व भाजीपाल्याची आवक-जावक सुरु झाली आहे.

धरण क्षेत्रात पाऊस असला तरी त्याचा जोर कमी आहे. राधानगरी धरणाच्या दोन दरवाज्यातून प्रतिसेकंद ४३५६ घनफूट, दूधगंगेतून ८१०० तर वारणा धरणातून १६ हजार ९७६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. सोमवारी सकाळी पंचगंगा नदीची पातळी ४६.४ फूट होती, रात्री पर्यंत ती ४५.६ फुटापर्यंत खाली आली होती.

पडझड सुरूच..

गेली आठ दिवस जिल्ह्यात पावसामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढत आहे. रोज सरासरी २०० पेक्षा अधिक घरांची पडझड होत आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात २२६ खासगी मालमत्तांची पडझड होऊन त्यात ६१ लाख ६६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

एसटीचे ६६२ फेऱ्या रद्द

महापुराच्या पाण्याचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. सोमवारी तब्बल ६६२ फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे ६ लाख ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

बालिंगा पुलावरून दुचाकीची वाहतूक

कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाशेजारील पाणी उतरले आहे. पण, पुलाच्या सुरक्षिततेच्या कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतूक बंद केली होती. सोमवारी सायंकाळपासून दुचाकीची वाहतूक सुरु झाली आहे.

  • पंचगंगेच्या पातळीत घसरण : १० इंचाने
  • सध्याची पातळी : ४४.७ फूट
  • बंधारे पाण्याखाली : ७७
  • मार्ग बंद : ५३
  • नुकसान : २२६ मालमत्ता
  • नुकसानीची रक्कम : ६१ लाख ६६ हजार


हे मार्ग अद्याप ठप्पच

कोल्हापूर ते मलकापूर
काेल्हापूर ते गगनबावडा (बालिंगा येथून दुचाकी वाहतूक सुरु)

Web Title: Less rain in Kolhapur district, The flood receded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.