कोल्हापुरात पावसाची उघडीप, पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट ८ इंच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 12:07 PM2022-07-15T12:07:32+5:302022-07-15T12:08:33+5:30
पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा इंचाने वाढत असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर : शहर, जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या सतंतधार पावसाने आज, शुक्रवारी सकाळपासून उघडीप घेतली आहे. मात्र, ढग दाटून येताच अधून-मधून मोठ्या सरी कोसळत आहेत. आज, सकाळी पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट ८ इंचावर पोहचली होती. इशारा पातळीवर जाण्यासाठी केवळ दीड फूट शिल्लक असल्याने प्रशासन सतर्क राहून बाधित ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना देत आहे. एकूण ६४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
थांबून थांबून जोरदार सरी कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा इंचाने वाढत असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मध्यरात्री पाणी पातळी इशारा पातळीवर पोहण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणातून १४०० क्युसेक विसर्ग
राधानगरी धरणात १५१.४३ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
चोवीस तासातील पाऊस
गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले : १४.६, शिरोळ : ८.८, पन्हाळा : ४३.४, शाहूवाडी : ४८.४, राधानगरी : ५१.१, गगनबावडा : ७७.७, करवीर : ३०.२, कागल : २६.३, गडहिंग्लज : १८.९, भुदरगड : ४८.३, आजरा : ३९, चंदगड : ७२.७.
हे बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगाव व तारळे, कासारी नदीवरील वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगाव व शेळोली, घटप्रभा नदीवरील कानर्डे सावर्डे, हिंडगाव, तारेवाडी व अडकूर, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदूळवाडी, शिगाव, खोची, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकुड, सिद्धनेर्ली व सुळंबी, कुंभी नदीवरील शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, तुळशी नदीवरील बीड व आरे, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील सुळे, पणुंद्रे व आंबर्डे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी असे बंधारे पाण्याखाली आहेत.
पाणी पातळी फुटांमध्ये अशी :
राजाराम : ३६.१०, सुर्वे : ३५.१, रुई : ६५, इचलकरंजी : ६०.६, तेरवाड : ५५.३, शिरोळ : ४७.९, नृसिंहवाडी : ४७.६, राजापूर : ३५.९ फूट.
धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा :
राधानगरी : ५.१०, तुळशी : २.०८, वारणा : २१.५४, दूधगंगा : १३.०२, कासारी : १.९७, कडवी : १.६५, कुंभी : १.६४, पाटगाव : २.२१, चिकोत्रा : ०.९४ , चित्री : १.०७, जंगमहट्टी : ०.७९ , घटप्रभा : १.५६, जांबरे : ०.८२, आंबेओहोळ : ०.९९, कोदे :०.२१.
संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरून पाणी वाहत आहेत. वाहनधारकांनी पाण्यात वाहने घालू नयेत. गरज भासल्यास पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर