Rain: कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे, ५८ बंधारे पाण्याखाली; विशाळगडावर दगडी बुरुज कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 01:30 PM2022-07-14T13:30:52+5:302022-07-14T13:46:33+5:30

पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूटावर असल्याने आता केवळ दोन फुटाचाच फरक राहिला आहे.

Less rainfall in Kolhapur, Panchganga warning level; The stone tower collapsed on Vishalgad | Rain: कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे, ५८ बंधारे पाण्याखाली; विशाळगडावर दगडी बुरुज कोसळला

Rain: कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे, ५८ बंधारे पाण्याखाली; विशाळगडावर दगडी बुरुज कोसळला

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस कोसळत राहिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज, गुरुवारी सकाळपासून पावसाची जोर कमी असला तरी पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट २ इंचावर पोहचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूटावर असल्याने आता केवळ दोन फुटाचाच फरक राहिला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ‘वारणा’ व ‘राधानगरी’ धरणातून विसर्ग वाढल्याने तब्बल ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.

यातच शाहुवाडी तालुक्यातील विशाळगडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज कोसळला आहे. त्यामुळे याठिकाणाहून वाहतुक बंद करण्यात आली आहे. मात्र, पर्यायी मार्गाने लोक गडावर येत जात आहेत.

गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, चंदगड या तालुक्यात पाऊस जोरदार कोसळत आहे. दिवसभर एकसारखा पाऊस राहिल्याने नद्यांचे पाणी परिसरात विस्तीर्ण पसरले आहे. यामुळे ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेतच त्याचबरोबर ५ प्रमुख जिल्हा मार्ग व १३ ग्रामीण मार्ग असे १८ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. एस. टी. चे रंकाळा ते चौके, चंदगड ते इब्राहिमपूर व गगनबावडा ते धुंदवडे हे तीन मार्ग पूर्णपणे बंद राहिले आहेत.

गतवर्षीपेक्षा धरणात जादा साठा

राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा २.४१ टीएमसी, वारणा धरणात १.३२ टीएमसी तर दूधगंगा धरणात २.५७ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे असाच पाऊस राहिला तर धरणे लवकर भरण्यास वेळ लागणार नाही.

राधानगरी धरणातून १४०० क्युसेक विसर्ग

राधानगरी धरणात १४४.५६ दलघमी पाणीसाठा आहे. आज, गुरुवारी सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आजपासून दूध संकलनावर परिणाम होणार

काल, बुधवारी जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. दुधाची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू होती. मात्र पाऊस असाच सुरू झाला तर आज, गुरुवारपासून दूध संकलनावर परिणाम होणार हे निश्चित आहे.

पडझडीत १७.३४ लाखाचे नुकसान

पावसाचा जोर वाढत जाईल तसे पडझडीचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात दोन सार्वजनिक तर २९ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १७ लाख ३४ हजाराचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अलमट्टीतून विसर्ग वाढवला...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने ‘वारणा’, ‘पचगंगा’सह ‘कृष्णा’च्या पाण्याची फुगी वाढत आहे. महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवला आहे. बुधवारी प्रतिसेकंद १ लाख ४ हजार ३०५ घनफूट पाण्याची आवक होते तर १ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणातील   पाणीसाठा   टीएमसी

राधानगरी      २.४३         ४.८४
तुळशी         १.७५         १.९८
वारणा         १९.२१       २०.५३
दूधगंगा        ९.७४         १२.३१
कासारी        १.०५         १.८८
कडवी         १.१४         १.५४
कुंभी          १.३६         १.५९
पाटगाव       १.७४         २.१२

Web Title: Less rainfall in Kolhapur, Panchganga warning level; The stone tower collapsed on Vishalgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.