कमी पटांच्या शाळा बंद करणार नाही

By admin | Published: September 8, 2015 11:26 PM2015-09-08T23:26:02+5:302015-09-08T23:26:02+5:30

स्मृती इराणी यांचे आश्वासन : एस. डी. पाटील यांनी घेतली भेट; शिक्षण क्षेत्रासंबंधी सकारात्मक चर्चा

Less schools will not be closed off | कमी पटांच्या शाळा बंद करणार नाही

कमी पटांच्या शाळा बंद करणार नाही

Next

सरवडे : राज्या-राज्यांमध्ये शाळांच्या पटासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कमी पट संख्येच्या शाळा बंद करणार, अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित होत आहेत. मात्र, केंद्र सरकार प्राथमिक शिक्षणाला अतिशय महत्त्व देत असून, कोणत्याही परिस्थितीत वीसपटाच्या आतील शाळा बंद करणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. एस. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळास दिले.
दिल्ली येथील शास्त्री भवनात प्रा. पाटील यांच्या समवेत अंबादास वाजे, मंगेश मोरे आणि राजेश ठाकूर यांच्या शिष्टमंडळाने मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली. यावेळी राज्याच्या शैक्षणिक धोरणाबरोबरच शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरही चर्चा झाली. दरम्यान, आपण लवकरच बालेवाडी (पुणे) येथे भरणाऱ्या शिक्षक संघाच्या महाअधिवेशनास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थित राहू, असे आश्वासन इराणी यांनी दिले. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना पेन्शन न देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय अन्यायी असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. यावर शिक्षकांवर अन्याय होऊ न देता अंशत: पेन्शन देता येईल का, याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे मंत्री इराणी यांनी सांगितले.
शिक्षक पद निश्चितीतील त्रुटी दूर करणे, मोफत गणवेश, शिक्षकांवरील शालेय पोषण आहाराचे काम काढून ते इतरांना देणे, आदी विषयांवर चर्चा झाली. सन्मान वाटेल असा निर्णय आपण घेऊ, अशी ग्वाही इराणी यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Less schools will not be closed off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.