‘धडा’ शिकवणाऱ्यांनाच गिरवावे लागले ‘धडे’ !- गडहिंग्लज
By admin | Published: February 24, 2017 11:02 PM2017-02-24T23:02:02+5:302017-02-24T23:02:02+5:30
गेल्यावेळी तालुक्यातील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय कुपेकरांनी घेतला
राम मगदूम -- गडहिंग्लज --राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून बोलबाला असणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही जागांसह १५ वर्षांची पंचायत समितीवरील सत्ता गमावल्यामुळे ‘राष्ट्रवादी’वर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. एकमेकांना धडा शिकविण्याच्या नादातील नेत्यांनाच जनतेने गिरवायला लावले धडे, हेच या निकालाचे विश्लेषण ठरावे.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा कुपेकरांनी विकासकामांच्या आणि बेरजेच्या राजकारणावर स्वत:चे व पक्षाचे वर्चस्व त्यांच्या हयातीत तालुक्यात कायम राखले. मात्र, त्यांच्या पश्चात झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत ही राजकीय पुंजी राष्ट्रवादीला अबाधित राखता आली नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे कार्यकर्त्यांमधील अंतर्गत गटबाजी. किंबहुना, त्यामुळेच ही नामुष्की नेतृत्वावर व पक्षावर आली.
गेल्यावेळी तालुक्यातील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय कुपेकरांनी घेतला. त्यावेळी जि. प.च्या पाचही जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. यावेळीही तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, बेरजेऐवजी वजाबाकीच झाली. ‘बड्याचीवाडी’ गटात शिवप्रसाद तेलींच्या नाराजीचा तर ‘भडगाव’मध्ये पताडे गट दुरावल्याचा फटका बसला.
‘हलकर्णी’मध्ये आपल्या ‘मातोश्रीं’चीच उमदेवारी कायम ठेवून एकाचवेळी महाडिकांच्या ताराराणी आणि शिंदे-गड्यान्नावरांच्या तालुका विकास आघाडीतील घटक म्हणून ताकदीने रिंगणात उतरलेल्या सदानंद हत्तरकींना हलकर्णी पंचक्रोशीने भरभरून यश दिले. त्यास स्व. हत्तरकींच्या पुण्याईबरोबरच गंगाधर व्हसकोटी यांचा त्याग आणि नियोजनबद्ध राबणूकही कारणीभूत आहे. नेमका त्याचाच फटका ‘राष्ट्रवादी’च्या मुन्नोळींना बसला.
‘भडगाव’ गटात अप्पी पाटील यांनी जि. प. ची उमेदवारी ‘चतुराई’ने भडगावमध्येच देऊन भडगाव-महागाव या दोनही मोठी गावांच्या मतांची बेरीज केली. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ची संगत सोडून ‘आघाडी’च्या नादी लागलेल्या पताडेंचा टिकाव लागला नाही. लोकसंपर्क आणि भावकी एक होऊनही चव्हाणांचा हिरमोड झाला.
नेसरीत सेनेचा सामना करण्यासाठी काँगे्रसशी युती करूनही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. जि. प. चा हट्ट सोडून पंचायत समितीच्या मैदानात उतरलेले गुरबेंनी एकाला दोन जागा पदरात पाडून घेऊन काँगे्रसचा हात बऱ्याच वर्षांनी पुन्हा सभागृहात पोहोचवला. कुपेकर घराण्यातील सत्तासंघर्षात भाजपच्या कोलेकरांना जि.प.ची लॉटरी लागली; परंतु अजातशत्रू दीपकदादांचा पराभव राष्ट्रवादीच्याही जिव्हारी लागला.
गिजवणे गटात भाजपच्या शहापूरकरांनी आणि काँगे्रसच्या कुराडेंनी जंग-जंग पछाडूनही राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांनी बाजी मारली. मात्र, या गटातील पंचायत समितीच्या दोनही जागा भाजपने काबीज केल्या.
राष्ट्रवादीस धडा शिकविण्यास शिंदे व गड्यान्नावर यांनी आघाडीची मोट बांधली. त्याचा हत्तरकींना फायदा तर पताडेंना तोटा झाला. बसर्गे गणाची जागा जिंकून स्वाभिमानीने पंचायत समितीमध्ये खाते उघडले तर गेली दहा वर्षे एकमेव सदस्य असूनही ‘दबदबा’ राहिलेल्या जनता दलाची पाटी यावेळी ‘कोरी’च राहिली.