कोल्हापुरात महिलांसह तरुणांनी गिरविले कोल्हापुरी फेटा बांधणीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:07 AM2019-03-16T11:07:28+5:302019-03-16T11:10:32+5:30
कोल्हापुरी फेटा डोक्यावर स्वत:च्या हातांनी आपल्या आणि इतरांच्या डोक्यावर बांधायचा कसा, याचे धडे शाहू स्मारक भवनच्या प्रांगणात आबालवृद्ध, युवक, युवतींनी गिरविले.
कोल्हापूर : कोल्हापुरी फेटा डोक्यावर स्वत:च्या हातांनी आपल्या आणि इतरांच्या डोक्यावर बांधायचा कसा, याचे धडे शाहू स्मारक भवनच्या प्रांगणात आबालवृद्ध, युवक, युवतींनी गिरविले.
फेटा बांधत असताना पाहण्याची उत्सुकता, सरसर वळणारी बोटे, फेट्याची घडी करून त्याचा तुरा खोवल्यानंतर डोक्यावर डौलाने, ऐटबाजपणे विराजमान झालेला फेटा पाहून कला अवगत झाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला. अवघ्या एका मिनिटात बांधला जाणारा फेटा डोक्यावर रुबाबदार दिसतो; पण या एका मिनिटाच्या मागे किती कष्ट असतात, याची अनुभूतीही उपस्थितांनी घेतली.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापुरी फेटा बांधण्याची कला जोपासली जावी, या हेतूने फेटा बांधणी प्रात्यक्षिक शिबिर घेण्यात आले.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खुपिरेचे अप्पासो रेवडे व शिंदेवाडीचे मिलिंद चव्हाण, अवधूत पाटील यांनी फेटा बांधायचा कसा याचे धडेच उपस्थितांना दिले. महिला, युवती, युवक, वृद्ध यांनी सोबत आणलेल्या फेट्यापासून कोल्हापुरी फेटा कसा बांधायचा हे समजून घेतले.
स्वत:च स्वत:च्या डोक्यावर बांधण्याबरोबरच इतरांच्या डोक्यावर कसा बांधायचा, गुंडाळी करताना बोटे कशी वळवायची, त्याची घडी कशी करायची, तुरा कसा काढायचा, तो खोवायचा कसा हे शिकून घेतले.
प्राचीन काळापासून शिरस्राण म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे फेटे देशभर बांधले जातात. कोल्हापुरातही सर्वसामान्य जनता फेटे बांधत असते. संस्थानकाळात शाहू महाराजांनी मोठ्या कार्यक्रमातही फेटे बांधायला द्यावेत, अशी इंग्रजांना विनंती केली. ती मान्य झाल्यानंतर कोल्हापुरी फेट्याची ओळख अधिक ठळक होत गेली, अशी आठवण इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितली.
खुपिरे येथील आप्पासो रेवडे हा युवक गेली १५ वर्षे फेटे बांधतो. आजोबांकडून फेटे बांधायला शिकलेले आप्पा आठवीपासून फेटे बांधतात. बांधणीचा वेग इतका आहे की, फेटा बांधायला एक मिनिटही त्यांना लागत नाही. त्यांना याबद्दल विचारले तर ‘ही एक कला आहे. सराव केला की काहीच अवघड नसते. फक्त एकाग्रता आणि शिकण्याची इच्छा पाहिजे,‘ असे त्यांनी सांगितले.