कामगारांची सोईच्या ‘एस.टी.’कडे पाठ, अपघाताला निमंत्रण : २५ गाड्या एमआयडीसीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:09 PM2019-07-11T12:09:49+5:302019-07-11T12:12:45+5:30
ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना नाइलाजास्तव अवैध खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या सोईसाठी त्यांच्या गावांतून एम.आय.डी.सी.पर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. मात्र याकडे कामगारांचे दुर्लक्ष करून अशा धोकादायक वाहतुकीद्वारे प्रवास करीत असल्याने पुन्हा एकदा अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना नाइलाजास्तव अवैध खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या सोईसाठी त्यांच्या गावांतून एम.आय.डी.सी.पर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. मात्र याकडे कामगारांचे दुर्लक्ष करून अशा धोकादायक वाहतुकीद्वारे प्रवास करीत असल्याने पुन्हा एकदा अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
जिल्ह्यामध्ये गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित, शिरोली या औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामीण भागातील कामगार मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येतात. त्यांपैकी काहीजण दुचाकीवरून प्रवास करतात; पण ज्यांच्याकडे दुचाकी नाही, त्या कामगारांना व्हॅन, अॅपे रिक्षा, रिक्षा, जीप यांतून प्रवास करावा लागतो आहे.
हे वाहनधारक जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून जादा फेऱ्या करण्यासाठी वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे या मार्गावर अपघातांमध्ये वाढ झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळते. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
कामगार प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे कामगारांच्या सोईसाठी गावातून एस. टी. उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यानुसार आता एस. टी. गाड्या सोडण्याचे व कामगारांना ने-आण करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे कामगारांचा प्रवास सुखकारक आणि सुरक्षित होणार आहे.
कोल्हापूर विभागातर्फे २५ गाड्या
एमआयडीसीला जाणाऱ्या कामगारांसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने २५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये ७५ फेऱ्यांची सोय केली आहे. यामध्ये कोल्हापूर आगारामधून ०२, संभाजीनगर ०२, गडहिंग्लज ०४, गारगोटी : ०३, कागल : १०, राधानगरी : ०४ या मार्गांवर गावातून गाडीची सोय केली आहे. मात्र प्रवासी याकडे पाठ फिरवीत आहेत.
अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या गावातून एमआयडीसीपर्यंत जाण्यासाठी तीन शिफ्टमध्ये एस.टी.ची सोय केली आहे. यासाठी कामगारांना सवलतीचा प्रवासी पास दिला जातो. मात्र बहुतांश कर्मचारी हे एस.टी. बसची सेवा सुरक्षित असतानाही तिचा लाभ घेत नाहीत.
- रोहन पलंगे,
विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग
उत्पन्न वाढविण्यासाठी खासगी वाहने
आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एमआयडीसीमधील काही कर्मचाºयांनी प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने घेतली आहेत. यामधून ते इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जातात. एमआयडीसीमध्ये श्रमाचे काम, कामावर वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने अनियंत्रित वेगाने गाडी चालविल्याने डोळ्यांवर झापड येतेच; त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अपघातामुळे एक व्यक्ती नव्हे तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.