कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन’कडून मदतकार्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:20 PM2018-12-03T12:20:31+5:302018-12-03T12:21:02+5:30
पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करायचे?... अपघात झाल्यावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करायचे?... तसेच कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत कसे मदतकार्य करायचे?... याचे प्रात्यक्षिकासह धडे रविवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले.
कोल्हापूर : पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करायचे?... अपघात झाल्यावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करायचे?... तसेच कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत कसे मदतकार्य करायचे?... याचे प्रात्यक्षिकासह धडे रविवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोल्हापुरातील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह ओंकार कारंडे, कृष्णात सोरटे, महेश पाटील, आदींनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणपर मार्गदर्शन केले. यामध्ये पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करायचे? अपघात झाल्यावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करायचे? तसेच कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत कसे मदतकार्य करायचे? त्याचबरोबर आग विझविण्यासाठी अग्निशमन सिलिंडर कसे हाताळायचे, दुर्गम भागात दुर्घटना घडल्यास येथील जखमींना किंवा अत्यवस्थ रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेण्यासाठी लागणारे स्ट्रेचर हे आपल्याजवळील दोरी, चादर, बांबू या वस्तूंपासून कसे तयार करायचे, आदींचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचबरोबर एखाद्या आपत्तीच्या घटनेला कशा प्रकारे तोंड देऊन बचावकार्य करायचे याचेही सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह शिक्षक व आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी उपस्थित होते.