सांगलीत भाजप बैठकीकडे खासदार गटाची पाठ
By admin | Published: June 24, 2016 11:48 PM2016-06-24T23:48:20+5:302016-06-25T00:50:05+5:30
‘वालचंद’च्या वादाची पार्श्वभूमी : आगामी निवडणुकांची तयारी करण्याची कार्यकर्त्यांना सूचना
सांगली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि दोन वर्षांनी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सांगलीत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीकडे खासदार संजयकाका पाटील गटाने पाठ फिरवली. त्यामागे वालचंद महाविद्यालयात झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा बैठकीस्थळी सुरू होती. निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ बैठकीत केले .
येथील टिळक स्मारक मंदिरात शहर जिल्हा आणि ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, रमेश शेंडगे, मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा भारती दिगडे आदी उपस्थित होते.
या बैठकीला खासदार संजयकाका पाटील अनुपस्थित होते. ते कवठेमहांकाळ येथील नियोजित कार्यक्रमात असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी वालचंद महाविद्यालयाच्या ताब्यावरून खासदार पाटील व पृथ्वीराज देशमुख यांच्यात वाद रंगला होता. देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. त्यानंतर खासदार पाटील व त्यांच्या समर्थक सर्वपक्षीय नेत्यांनी महाविद्यालयाचा ताबा घेत देशमुखविरोधी गटाला साथ दिली होती. यावरून पाटील व देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाले. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते, पण खासदार पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते.
यावेळी देशमुख म्हणाले की, जत तालुक्यातील गुड्डापूर येथे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा विशेष प्रशिक्षणवर्ग होणार आहे. खासदार,आमदार, प्रमुख पदाधिकारी यांना प्रशिक्षण बंधनकारक आहे. या शिबिरात जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीची तयारी करून घेतली जाणार आहे . पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत २८ जून रोजी या निवडणुकीसंदर्भात बैठक होईल.
आमदार गाडगीळ म्हणाले की, येत्या आठ दिवसात मंडल पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी, प्रत्येक भागात कार्यकर्त्यांची सक्षम फळी तयार करा. राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या दीड वर्षात २६ कोटींची विकासकामे केली. आम्ही दोघा आमदारांनी ५६ कोटींची कामे केली. आता निवडणुका तोंडावर आहेत. पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील लोकांपर्यत पोहोचावे.
आमदार खाडे म्हणाले की, जिल्ह्यात ६६ टक्के भाजपची, तर ४४ टक्केकाँग्रेसची सत्ता आहे. आगामी निवडणुका ताकदीने लढवू. यावेळी मुन्ना कुरणे, मकरंद देशपांडे यांचीही भाषणे झाली. यावेळी प्रकाश ढंग यांनी प्रदेश कार्यकारिणीत झालेल्या ठरावाचे वाचन केले. (प्रतिनिधी)