घोषणाबाज सरकारला गुडघे टेकायला लावू

By admin | Published: May 22, 2017 12:37 AM2017-05-22T00:37:31+5:302017-05-22T00:37:31+5:30

घोषणाबाज सरकारला गुडघे टेकायला लावू

Let the announcement of Government kneeling | घोषणाबाज सरकारला गुडघे टेकायला लावू

घोषणाबाज सरकारला गुडघे टेकायला लावू

Next


शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांची ‘पुणे ते मंत्रालय’ अशी ‘आत्मक्लेश’ यात्रा आजपासून सुरू होत आहे. गेल्या दहा वर्षांतील त्यांची ही चौथी मोठी यात्रा आहे, मागील तीन यात्रा सत्तेत नसताना काढल्या होत्या; पण आता सत्तेत असूनही सरकार विरोधात उघडपणे त्यांनी ‘शड्डू’ ठोकला आहे. आत्मक्लेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचा विश्वास गमावल्याने मोठ्या आशेने राज्यातील शेतकऱ्यांनी भाजपला सत्तेवर बसवले. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच नेत्यांनी मोठ-मोठी आश्वासने दिली होती, त्याचा विसर सरकारला पडल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. तीन वर्षे नुसत्या घोषणात गेली असून आश्वासने जर पाळता येत नसतील तर शेतकऱ्यांना फसविल्याचे सरकारने एकदा जाहीर करावे, पण लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे. या घोषणाबाज सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा खरमरीत इशारा खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
दोन्ही काँग्रेसने शेतकऱ्यांना लुटले होते, त्यांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व हमीभावाचे आश्वासन दिले होते; पण आश्वासने विसरायला पंतप्रधान काय सामान्य माणूस नाहीत. दिलेला ‘शब्द’ पाळण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळता येणार नसल्याचे केंद्र सरकार धडधडीत सर्वोच्च न्यायालयात सांगते. त्यावरून मोदी यांनी अज्ञानातून आश्वासने दिली असावीत किंवा त्यांना शेतकऱ्यांना फसवायचे होते, असे दोन अर्थ निघतात. आम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्रात भाजपला साथ देऊन काँग्रेसची पंधरा वर्षांची राजवट उधळून लावली त्याप्रमाणे रामपाल जाट यांनी राजस्थानमध्ये वसुंधराराजे सिंधिया यांचे सरकार आणले; पण दुर्दैवाने तेही भाजप सोडून बाहेर पडले आणि आम्हीही नाराज आहोत. तुमच्या विरोधात संघर्ष करायला आम्ही वेडे आहोत का? सरकारने आता घोषणाबाजी बंद करून कृती करावी. ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याची घोषणा केली, पाच लाख शेततळी बांधण्याचे आश्वासन दिले आणि बांधली केवळ पाच हजार, दहा हजार सोलर पंप शेतकऱ्यांना वाटण्याचे आश्वासन दिले आणि वाटले केवळ दीड हजार, केवळ थापा मारून निवडणुका जिंकण्याचे काम भाजप सरकार करत आहे. तीन वर्षे वाट पाहून आमची सहनशीलता संपली आहे, ‘आत्मक्लेश’ यात्रेतून आश्वासन पूर्ततेची आठवण करून देत आहे. आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढवून कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला.

व्यक्तीपेक्षा चळवळ मोठी...!
शेतकऱ्यांच्या त्यागातून व बलिदानातून चळवळ उभी राहिली आहे, कोण गेले आणि कोण आले म्हणून त्याची ताकद कधी कमी होत नसते आणि वाढतही नसते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला दिवगंत नेते शरद जोशी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना ताकद दिली. त्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवला आहे, माझ्यानंतर उद्या दुसरा कोणी तरी असेल.
माझ्यादृष्टीने सध्या इतर मुद्दे गौण असून सर्व लक्ष ‘आत्मक्लेश’ यात्रेवर आहे, अशा शब्दांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी सूचक इशारा दिला.
तर ‘त्यांना’ तुरुंगात डांबा
कारखाना विक्री व जलसंपदा घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यासाठी काँग्रेस सरकारच्या काळात गाडीभर पुरावे गोळा करणाऱ्यांच्या हातातच आता सत्ता आहे; पण आता तुरुंगात कोणी दिसेना, उलट ‘वाल्याचे वाल्मिकी’ झाल्याचे सांगत त्यांना ‘भाजप’मध्ये घेऊन त्यांचे शुद्धिकरण सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली.
‘दादा’ चैनीसाठी कर्जमुक्ती नको!
‘पहिल्यांदा शेतकरी सक्षम मगच कर्जमाफी’ या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते. शेतकऱ्यांच्या मानेवरील कर्जाचा बोजा कमी झाल्याशिवाय तो सक्षम कसा होणार? शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर त्यांना सक्षम करणार आहात का? आम्हाला चैनीसाठी कर्जमुक्ती नको, असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Let the announcement of Government kneeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.