Hasan Mushrif: ‘प्रोत्साहनपर’ अनुदान योजनेतील त्रुटी दूर करु, मंत्री हसन मुश्रीफांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:25 PM2022-06-28T16:25:40+5:302022-06-28T16:26:08+5:30
राज्य सरकारद्वारे २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१९-२० या कालावधीत परतफेड केेलेल्या रकमेवर ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे
कोल्हापूर : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मात्र निकषांमध्ये काही त्रुटी असून त्या दूर करण्यासाठीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.
राज्य सरकारद्वारे २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१९-२० या कालावधीत परतफेड केेलेल्या रकमेवर ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मात्र या योजनेचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही. पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पाहिला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीचा आहे. त्यातच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात २०१९ व २०२१ ला महापूर आला होता. या कालावधीत शेतीचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने नुकसान भरपाई दिली. भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना यातून वगळण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत.
याबाबत, मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता, या योजनेत काही त्रुटी आहेत, हे लक्षात आले आहे. याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. ज्या वर्षी पीक कर्ज घेतले त्याच वर्षी परतफेड करणे ऊस उत्पादकांना अडचणीचे असते. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांना निश्चित न्याय देऊ, असे त्यांनी सांगितले.