संघर्ष यात्रेचा शेवट काशीत करावा! सदाभाऊंचा कॉँग्रेस-राष्ट्रवादीला टोला :
By admin | Published: April 29, 2017 06:12 PM2017-04-29T18:12:31+5:302017-04-29T18:12:31+5:30
शेतकऱ्यांच्या रक्ताने हात माखलेल्यांची नैतिकता काय?
लोकमत आॅनलाईन
कोल्हापूर, दि. २९ : कॉँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर सत्तेच्या काळात केलेल्या पापांतून उतराई होण्यासाठी आहे. त्यांनी संघर्ष यात्रेचा शेवट काशीमध्ये जाऊन अंघोळ करून करावा; म्हणजे थोडेफार पापही धुऊन जाईल, अशी खिल्ली कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उडविली.
ऊसदरासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या छाताडावर गोळ्या घातल्या. या मंडळींचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले असून त्यांना कर्जमाफीची मागणी करण्याची नैतिकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शनिवारी एका विवाह सोहळ्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. मुस्लिम बोर्डिंग येथे त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका काय याबाबत बोलताना खोत म्हणाले, या देशात तीन वेळा कर्जमाफी झाली. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या काळात विकास संस्थांना कर्जमाफी दिली. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने दुसऱ्यांदा, तर तिसरी मनमोहन सिंग यांच्या सरकारने तिसऱ्यांदा थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. विदर्भ व मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील आत्महत्या रोखण्यासाठी मनमोहन सिंग यांनी कर्जमाफी आणली; पण अडीच एकरांची अट घातल्याने त्याचा फायदा तेथील किती शेतकऱ्यांना झाला. सात वर्षांनी पुन्हा कर्जमाफीची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त होऊन त्याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.
‘शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे. यासाठी जलयुक्त शिवार योजनेत मोठी गुंतवणूक केल्याने आज त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. एकीकडे पायाभूत सुविधा भक्कम करीत असताना कर्जमुक्ती कशी करता येईल याचा विचार आम्ही करीत आहोत. ‘कर्जमुक्ती’च्या लोकप्रिय घोषणेत शेतकऱ्यांना अडकून ठेवण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहे; पण याच लोकांना कर्जमाफीसाठी १९८८ नंतर २००८ साल का उजाडले? कर्जमाफी हवीच होती तर विधानसभेच्या जाहीरनाम्यात मागणी का नव्हती? ऊस आंदोलनात शेतकऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले. दोन्ही कॉँग्रेसच्या मंडळींचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांना संघर्ष यात्रा काढण्याची नैतिकता नसल्याचे खोत यांनी सांगितले.
हवामान अंदाजासाठी स्वंयचलित यंत्रे लहरी हवामानामुळे शेती अडचणीत येत आहे. यासाठी राज्य सरकारने हवामानाचा अंदाज घेणारी २६०० स्वयंचलित यंत्रे उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्यमंत्री खोत यांनी सांगितले. रघुनाथदादांनी कारखानदारांच्या गळी उतरावे गुजरातमधील ‘गणदेवी’ कारखान्याप्रमाणे दर द्यावा, ही दहा वर्षे आमची मागणी आहे. रघुनाथदादांचा अभ्यास मोठा आहे. आपण लहान कार्यकर्ता आहे. गाळप झालेल्या उसाला एक हजारच का ‘गणदेवी’इतका दर देण्यासाठी त्यांनी ते कारखानदारांच्या गळी उतरवावे, असा टोला खोत यांनी हाणला.