शेतकऱ्यांना नागविणाऱ्या सरकारला नमवू
By admin | Published: June 6, 2017 12:55 AM2017-06-06T00:55:41+5:302017-06-06T00:55:41+5:30
संपतराव पवार : तहसील कार्यालयासमोर केली निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आतापर्यंतच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, त्यामुळे कर्जमाफी देऊन कोण उपकार करत नाही. शेतकऱ्यांना नागविणाऱ्या सरकारला नमविल्याशिवाय आता थांबायचे नाही, असा इशारा माजी आमदार संपतराव पवार यांनी दिला.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी पेठेतून दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढून करवीर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना संपतराव पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. सरकार गेंड्याच्या कातडीचे असून त्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नसल्याचे सांगत पवार म्हणाले, अल्प भूधारकांना कर्जमाफी देण्याचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना सर्वच राज्यकर्त्यांनी फसवले आहे, आता हे चालणार नसून आमची धूळफेक करणाऱ्यांना उधळून लावल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही. गेली पाच दिवस शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, पण सरकार असंवेदनशील असल्याने त्यांच्यावर काहीच फरक पडलेला नाही. येत्या चार दिवसांत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल. जमिनीत कसे पेरायचे आणि त्याची काढणी कशी करायची, याचे ज्ञान शेतकऱ्यांना चांगले आहे, त्यामुळे कोणी शेतकऱ्यांना भीती घालू नये; पण एक लक्षात ठेवा शेतकऱ्यांना नागवणाऱ्या सरकारला नमविल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा संपतराव पवार यांनी दिला.
यावेळी मागणीचे निवेदन करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘भोगावती’ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोक पवार, केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, बाजार समितीचे संचालक अमित कांबळे, बाबूराव कदम, पोपट ढवण, सरदार पाटील, डी. पी. कांबळे, तुकाराम खराडे, कुमार जाधव, संग्राम माने, मधुकर हरेल, सुशांत बोरगे, सुनीलकुमार सरनाईक, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदार उत्तम दिघे यांना मागण्यांचे निवेदन संपतराव पवार यांनी दिले.