केवळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ : चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:29 PM2018-10-20T14:29:16+5:302018-10-20T14:43:44+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा शपथविधी झाल्यानंतर केवळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात दिले.
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा शपथविधी झाल्यानंतर केवळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात दिले.
महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे खंडपीठ कृती समिती व सर्वपक्षीय खंडपीठ नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, खंडपीठ नागरी कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार, खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस, आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांचा शपथविधी होणार आहे. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर तत्काळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ तसेच निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. तो तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल व जागेचाही प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल.
यावेळी अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नरेश पाटील यांच्या नावाची शिफारस झाल्याची बाब स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेबाबत मुख्य न्यायाधीशांना सत्वर पत्र द्यावे तसेच ठोक निधीची तरतूद करावी. जागेचा प्रश्न मार्गी लावावा, अशा विनंतीचे निवेदन पालकमंत्री पाटील यांना दिले. प्रतापसिंह जाधव यांनी पालकमंत्री यांच्याकडे सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी भूमिका मांडली.
खंडपीठ नागरी कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले. ज्येष्ठ वकील अॅड. महादेवराव आडगुळे यांनी या संदर्भातील पूर्वीच्या बैठकीमध्ये झालेल्या बाबींचा ऊहापोह केला.
यावेळी खंडपीठ नागरी कृती समितीचे बाबा पार्टे, प्रसाद जाधव, दीपा पाटील, प्रा. जयंत पाटील, राजू लिंग्रस, सुभाष जाधव, अॅड. बाबा इंदूलकर तसेच अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. अजित मोहिते, अॅड. शिवाजीराव राणे व बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. आनंदराव जाधव, सेक्रेटरी अॅड. सुशांत गुडाळकर, आदी उपस्थित होते.