संजय मंडलिकांना खासदार करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:49 AM2017-12-18T00:49:14+5:302017-12-18T00:50:18+5:30
मुरगूड : काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधात लढलो असलो, तरी विकासासाठी राजकीय वैर विसरून आम्ही एकत्र आलो आहोत. स्वर्गीय मंडलिक यांच्या इच्छेनुसार आता संघर्ष मिटवायचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुरगूडची खासदारकीची खंडित झालेली परंपरा आपण पुन्हा सुरू करूया. कागलमध्ये मी, मंडलिक आणि प्रवीण पाटील एकत्र आलो तर जे मताधिक्य मिळेल, ते फेडायला विरोधकांना सात जन्म घ्यावे लागतील. संजय मंडलिकांसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील, असे आश्वासन माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले.
मुरगूड (ता. कागल) येथे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित विकासकामांच्या प्रारंभानंतर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय मंडलिक होते. प्रारंभी हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या समोरील चौक सुशोभीकरण प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, तर विजया उद्यान विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते, तसेच शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडले. विविध रस्त्यांचे उद्घाटन वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस हे चांगले मित्र आहेत. त्यामुळे कागलसाठी २० कोटींचा निधी आणला. आता मुरगूड शहराला देशात टॉपवर नेण्यासाठी आपण वाट्टेल ती मदत करणार आहोत. विकासकामांसाठी आपण संजय मंडलिक, सतेज पाटील व प्रवीणसिंह पाटील एकत्रित प्रयत्न करणार आहोत. मी मंडलिकांचे नेतृत्व मान्य केले होते. त्यांनी दिलेल्या नेतृत्व गुणांवरच आपण कार्यरत राहणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
माजी मंत्री व आमदार सतेज पाटील म्हणाले की, कार्यक्रमाला येताना मी आणि मुश्रीफ प्रवीणसिंह पाटील यांना सोबत घेऊन आलो आहोत. बदलत्या राजकारणाच्या समीकरणामुळे आपला शत्रू निश्चित करण्याची भूमिका या व्यासपीठाने दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी होती. यामध्ये मुश्रीफ यांनी आपल्याला गळ घातली होती, तर पक्षांचीही काही बंधने होती; पण आता त्याची चिंता कागलकरांना करायची गरज नाही. सदाशिवराव मंडलिक यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आणि मुश्रीफ यांना श्री गणेश शक्ती देईल. संजय मंडलिक हेच लोकसभेचे उमेदवार असतील याकडे लक्ष केंद्रित केले.
यावेळी प्रा. संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये मंडलिक, मुश्रीफ दूर झालेत; पण आज त्याच बँकेच्या कार्यक्रमामुळे मंडलिक, मुश्रीफ गट परत एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्वर्गीय मंडलिक हे विकासकामांमध्ये राजकारण आणत नव्हते. आज याच विचाराने दूर गेलेले मुश्रीफ, प्रवीणसिंह या व्यासपीठावर आहेत त्यामुळे आपण धन्य झालो.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनीही विकासमकामांत राजकारण न आणता आपण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. वीरेंद्र मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले यांनी स्वागत केले, प्रास्ताविक नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले. यावेळी युवराज पाटील, नामदेव मेंडके, धनाजी गोधडे, शिवाजीराव चौगले, मुख्याधिकारी संजय गायकवाड, दीपक शिंदे, शामराव पाटील-यमगेकर, संदीप कलकुटकी, रवी परीट, प्रतिभा सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, सुप्रिया भाट, अनुराधा राऊत, रंजना मंडलिक, हेमलता लोकरे, रूपाली सनगर, वर्षाराणी मेंडके, संगीता चौगले, आदी उपस्थित होते.
तलावावरील हक्क सोडणार नाही
मुरगूड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी आम्ही २० कोटी रुपयांची नवी योजना कार्यान्वित करणार आहोत, पण सर पिराजीराव तलावावर असणारा हक्क सोडणार नाही. समरजित घाटगे यांनी या तलावाच्या वरील बाजूला शेती जरूर करावी; पण यामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करावा, कारण त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, असे प्रा. संजय मंडलिक यांनी सांगितले.